नाशिक – महानगरपालिकेने शहरातील नऊ ठिकाणी वाहतूक बेट विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, विकासकामं आणि देखरेखीसाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत. सीएसआर निधीअंतर्गत हे काम करण्यासाठी जवळपास ९ खासगी कंपन्यांनी रस दाखवला आहे.
स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत अध्यक्ष गणेश गिते यांनी प्रशासनाच्या या प्रस्तावाला विनाचर्चा मंजुरी दिली. या प्रस्तावानुसार, खासगी कंपन्यांना वाहतूक बेटांचा आराखडा तयार करणं, विकसित करणं आणि त्यावर देखरेख ठेवणं दहा वर्ष बंधनकारक राहील. वाहतूक बेटांसाठी महापालिकेचा कोणताही निधी खर्च होणार नसून, कंपन्यांच्या सीएसआर निधीतून कामे केले जातील.परंतु दहा वर्षांसाठी कंपन्यांना ५ हजार ते २१ हजार रुपयांपर्यंत स्वामित्व शुल्क महापालिकेला अदा करावं लागेल. या नऊ कंपन्यांकडून महापालिकेला जवळपास ७२ लाख रुपयांचे स्वामित्व शुल्क मिळेल.
या ठिकाणी वाहतूक बेट
जिल्हा रुग्णालयाच्या विरुद्ध बाजूला असलेले सायकल ट्रॅक, कॉलेज रोडवरील मॉडेल कॉलनी, सातपूरमधील महिंद्र अँड महिंद्र सर्कल, राका कॉलनी सर्कल, जेल रोड परिसरातील समतानगर टाकळी सर्कल, द्वारका परिसरातील उपनगर सर्कल. दरम्यान, या नऊ कंपन्यांतर्फे सातपूर परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहसुद्धा बांधण्यात येणार आहेत.