नाशिक – दसऱ्यापासून शहरातील ४५० जीम सुरू होणार आहेत. नाशिकच्या जीम मालक आणि प्रशिक्षक संघटनेने सांगितले की, सध्या अनेक फिटनेस सेंटर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. आता ते पुन्हा सुरू झाल्यास त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.
कोविड -१९ च्या उद्रेकानंतर जिम आणि फिटनेस केंद्रे गेली सात महिने बंद होती. शेकडो लोक या क्षेत्रावर अवलंबून आहेत. व्यायामशाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने चांगला निर्णय घेतला आहे, असे नाशिकच्या व्यायामशाळा मालक आणि प्रशिक्षक संघटनेचे अध्यक्ष विनोद गांगुर्डे यांनी सांगितले. परंतु सात महिने आमची व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर बंद पडल्यामुळे आमचा आर्थिक तोटा झाला आहे. भाड्याने घेतलेल्या हॉल मध्ये कार्यरत असणाऱ्या जिमचे अद्याप भाडे भरलेले नाही. राज्य शासनाने व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटरना आता परवानगी दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आता यासाठी कर्ज मिळावे, अशी आमची इच्छा आहे, असेही गांगुर्डे म्हणाले.
शहरातील फिटनेस सेंटरचे संचालक विपूल नेरकर म्हणाले की, औषधे घेण्याबरोबरच-प्रतिकारशक्ती वाढविणे देखील महत्त्वाचे आहे. शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती टिकवण्यासाठी दररोजच्या व्यायामाची गरज असते. आम्ही एक-दोन दिवसांत स्वच्छता उपक्रम राबवू. आम्ही राज्य सरकारने जारी केलेल्या सर्व एसओपीचे अनुसरण करू. फिटनेस सेंटरच्या जागेनुसार सदस्यांना परवानगी दिली जावी. आम्ही सदस्यांना वेळ स्लॉट देऊ, नेरकरही म्हणाले. या बाबत माहिती देताना विशेषज्ज्ञ यतींद्र दुबे म्हणाले की, शहरात रुग्णांच्या संख्येत घट होईपर्यंत आम्हाला सुमारे तीन आठवडे थांबावे लागेल. शहरातील अनेक जिम आणि फिटनेस सेंटर छोट्या जागांवर कार्यरत आहेत. गर्दीमध्ये व्हायरसचे प्रसारण होण्याची शक्यता जास्त असते.