नाशिक – शहरातील दोन कोविड सेंटर बंद होण्याच्या मार्गावर आहेत. महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या द्वारका परिसरातील नासर्डी पुलावरील समाज कल्याण विभागाचे वसतिगृह आणि पंचवटीतील मेरी परिसरात असलेले पंजाबराव देशमुख रुग्णालय येथील कोविड सेंटर बंद होणार आहेत.
शाळा व महाविद्यालय सुरु करण्यासाठी परवानगी दिल्यास शासकीय वसतिगृह वापरात येणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा व महाविद्यालये सुरु झाल्यास संबंधित वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी दिले जाते. राज्यात अनलॉक अंतर्गत शाळा, महाविद्यालये सुरु करण्याप्रश्नी चर्चा सुरु असून लवकरच याबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. समाजकल्याण वसतिगृह इमारतींमध्ये ५०० बेडची क्षमता असून सध्या तेथे १५१ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच पंचवटी येथील वसतिगृह इमारतीमध्ये २०० बेड्सची क्षमता असून सध्या ४७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, शहरातील कोरोना स्थिती आटोक्यात असल्यानेही या सेंटरमधील कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीयरित्या घट झाली आहे.