नाशिक – शहरातील बाजारपेठ परिसर तसेच नागरी वस्तीमध्ये सार्वजनिक स्वच्छता राहावी याकरीता महानगरपालिकेने विविध ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती केली आहे. या स्वच्छतागृहांची स्वच्छता आता मशिनद्वारे केली जाणार आहे.
शहरातील स्वच्छतागृह ब-याच अंशी अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. त्याची दखल महापालिकेने घेतली आहे. एस.ॲन्ड एम. ट्रेडींग कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी मंगेश गांधी यांनी त्यांच्या संस्थेने यासंदर्भात महापालिकेशी संपर्क साधला. त्यांनी तयार केलेले पाण्याचे प्रेशर मशिनव्दारे स्वच्छता कशी राहते तसेच अशी स्वच्छतागृहे योग्य पध्दतीने स्वच्छ कशी ठेवता येईल याचे प्रात्याक्षिक सी.बी.एस. जवळील सार्वजनिक स्व्चछतागृह येथे दाखविण्यात आले. या प्रसंगी महापौर सतिश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे, विभागीय स्वचछता निरीक्षक पी. डी. पाटील आदी उपस्थित होते. अशा प्रकारच्या पाणी प्रेशर मशिनव्दारे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे हे आरोग्य विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा उभारुन स्वच्छ केल्यास शहराचे सार्वजनिक आरोग्य निश्चितच अबाधित राहण्यास मदत होणार आहे. नाशिक शहराचा स्वच्छ भारत अभियान मध्ये प्रथम क्रमांक येण्यास मदत होईल, असे महापौरांनी म्हटले आहे.