नाशिक – शहराच्या सर्व भागातील मुख्य बाजारपेठेला जोडणारे सर्व रस्ते आता बॅरिकेडस लावून बंद करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान आहे. याचाच एक भाग म्हणून हे रस्ते बॅरिकेडस लावून बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केवळ ग्राहक आणि विक्रेते यांनाच या भागात प्रवेश दिला जाणार आहे. अन्य नागरिकांना वाहतुकीसाठी हे रस्ते बंद करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभर पोलिस प्रशासनाकडून बॅरिकेडस लावण्याचे काम सुरू होते. तसेच, पोलिसांचा तंबू सुद्धा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून अत्यंत कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, हे रस्ते बंद करण्यात येत असल्याने नाशकात लॉकडाऊनची तयारी सुरू आहे की काय, अशी शंका व्यक्त केली जात होती. तशा अफवाही काही प्रमाणात पसरल्या होत्या. मात्र, पोलिसांनी खुलासा केल्यानंतर नाशिककरांना आता त्याचे खरे कारण कळाले आहे.