नाशिक – अवैध मद्यवाहतूक प्रकरणात शहरातील नामांकित दारू विक्रेत्याचा समावेश समोर आल्याने या विक्रेत्याची शहरातील चौदा दारू दुकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सील करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी या घटनेची गंभीर दखल घेत नाशिक गाठून अधिका-यांना कारवाईचे आदेश दिले आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक कार्यालयाने संबधीत दारू विक्रेत्याच्या दुकानांची झाडाझडती सुरू केली असून, त्यातील एका दुकानात वाहतूक परवाना नसलेला देशी दारूचा साठा मिळून आला आहे. तर उर्वरीत दुकानांमध्येही विसंगती आढळून आल्याने शहरातील तब्बल १४ दारू दुकाने एक्साईज विभागाने सील केले आहेत. त्यात वाईन शॉप, देशी दारू आणि बिअर बारचा समावेश आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोटीस बजावून ही कारवाई केली असून त्याबाबतचा चौकशी अहवाल जिल्हाधिका-यांना सादर केला जाणार आहे.
जिल्ह्यात येणारी दारू नजीकच्या दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्र शासित प्रदेशातून अल्पदरात उपलब्ध होत असल्याने नाशिकसह नगर, धुळे, जळगाव नंदूरबार या विभागात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. यावर मात करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जात आहे. एकुणच सिमा भागातून बेकायदा मद्य वाहतूक चर्चेत आली आहे.
असे आले नाव समोर
मुंबई – आग्रा महामार्गावरील मालेगाव नजीकच्या टेहरे फाटा येथे केलेल्या कारवाईमुळे या अवैध दारू वाहतूक आणि विक्रीचा पर्दाफास होण्याची शक्यता आहे. या कारवाईत पशूखाद्याच्या गोण्या असल्याचे भासवून ट्रकमधून मद्यवाहतूक केली जात होती. पोलीसांनी ट्रकसह लाखों रूपयांचा मद्यसाठा असा मुद्देमाल जप्त केला असून,याप्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात मुंबई दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात नाशिक शहरातील एका नामांकित दारू विक्रेत्याचे नाव या प्रकरणात समोर आले आहे.