नाशिक – नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या केशरी शिधापत्रिकाधारकांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश झालेला नाही त्यांना रेशन दुकानात सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. या स्वस्त दरातील धान्याचा लाभ केशरी शिधापत्रिकाधारकांनी घ्यावा, असे आवाहन धान्य वितरण अधिकारी श्वेता पाटोळे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानात प्रति व्यक्ती ३ किलो गहू प्रति किलो रूपये ८ दराने, २ किलो तांदूळ प्रति किलो रूपये १२ अशा सवलतीच्या दरात मिळणार आहे.
शहरातील धान्य वितरण अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या तसेच ज्यांचा राष्ट्रीय अन्न सुरक्षेत समावेश झाला नाही, अशा केशरी शिधापत्रिकाधारकांनी सवलतीच्या दरातील धान्याचा लाभ रेशन दुकानातून घ्यावा, असेही श्वेता पाटोळे यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.