नाशिक – मुंबई येथील भरारी प्रकाशनातर्फे झालेल्या राज्यस्तरीय गूढ कथा स्पर्धेत नाशिकच्या साहित्यिकांना प्रथम व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक शरद पुराणिक यांच्या किल्ले शहागड या गूढकथेने प्रथम, तर कथाकार सप्तर्षी माळी यांच्या मोगर्याची फुले या गूढ कथेने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकाविला आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ नाटककार (कै.)रत्नाकर मतकरी यांच्या नावाने देण्यात येणार असून, लवकरच मुंबई येथे साहित्यिक कार्यक्रमात हे पुरस्कार मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते वितरण होणार असल्याचे भरारी प्रकाशनच्या प्रकाशिका लता गुठे यांनी सांगितले आहे.
भरारी प्रकाशच्या वतीने राज्यस्तरीय गुढकथालेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लेखकांनी स्वलिखित कथा पाठविल्या होत्या. हा पुरस्कार कै. गुढकथाकार रत्नाकर मतकरी यांच्या नावाने देण्यात येणार आहे. निवड झालेल्या कथा ‘ताऱ्यांचे जग’ या दिवाळी अंकांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. डॉ. कृष्णा नाईक (रत्नाकर मतकरी यांच्या गूढ कथांवर पीएचडी केली आहे.) व कथाकार गुरुनाथ तेंडुलकर यांनी परीक्षक म्हणून चोख भूमिका बजावली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिकच्या साहित्यिकांना यश लाभल्याबद्दल नाशिकच्या साहित्यिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. शरद पुराणिक यांना आतापर्यंत ३४ राज्यस्तरीय, तर सप्तर्षी माळी यांना ५ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
खालील कथांची निवड पुरस्कारासाठी झाली आहे.
प्रथम : किल्ले शहागड – शरद पुराणिक
द्वितिय: बंदी : राजश्री बर्वे
तृतीय: मोगऱ्याची फुले : सप्तर्षी माळी
लक्षणिय कथा (उत्तेजनार्थ)
अ) त्या रात्री – लीना माटे
अ) फार्महाऊस – विराज चव्हाण
क) तीसरी मंजिल – सुमन नवलकर