नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुण्या, मुंबईतील चित्रपटाचे चित्रीकरण नाशिकमध्ये स्थिरावते आहे. शहरातील रामकुंड, गंगापूर रोड, इगतपुरी येथे चित्रकारण सुरू असून अशाच एका हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण शहरात सुरू आहे. ‘आफत – ए – ईश्क ‘ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या रामकुंड परिसरात होत आहे. झी स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे अनेक मराठी मालिकांचे चित्रीकरण इगतपुरी, त्र्यंबकेश्वर येथे सुरु आहे.
जिल्ह्याला लाभलेले अभूतपूर्व निसर्गसौंदर्य हिंदी चित्रपट क्षेत्रातील निर्मात्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मराठी चित्रपट व मालिकांचे अगोदरच नाशिक पसंतीचे आहे. आता हिंदी चित्रपटालाही याची भूरळ पडली आहे. त्यामुळे नाशिक परिसरात हिंदी चित्रपटाचे शुटींग सुमित खुराणा आणि प्रणव शास्त्री यांच्या माध्यमातून शूटिंग सुरू झाले आहे. शहरातील रामकुंड परिसर, गंगापूर रोड तसेच इगतपुरी येथे सध्या शूटिंग सुरू आहे. यामुळे पुन्हा एकदा नव्या रुपात नाशिक शहर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रजित नट्टोजी करत आहेत. लाईन प्रोड्युसर म्हणून नाशिकच्या एकंदत फिल्मचे अमित कुलकर्णी काम पाहत आहेत. चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग नाशिकमध्येच होणार असल्याचे अमित कुलकर्णी यांनी सांगितले आहे.
—-
नियमांच्या हद्दीत शूटिंग सुरु
कोरोनाचा पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन सेट वर होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच सेट वरील प्रत्येक व्यक्तीकडे वयक्तिक सॅनिटायझर, मास्क तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शूटिंग करतेवेळी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात असल्याचे दिसून आले आहे.