व्यावसायीकांकडे खंडणी मागितली, गुन्हा दाखल
नाशिक : कोयत्याचा धाक दाखवून सराईत गुन्हेगाराने व्यावसायीकांकडे खंडणी मागितल्याची घटना नुकतीच घडली. डिमांड वाढल्याने एका व्यावसायीकाने खंडणी देण्यास नकार दिल्याने संशयीताने व्यापा-यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत दोन दुकानांसह मालवाहू वाहनाचे नुकसान केले.याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल भगवान आढाव (रा.वासननगर) असे संशयीताचे नाव असून तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी धनंजय प्रभाकर शिंगणे (रा.इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. शिंगणे यांचे कालिकानगर भागातील हरि निवास सोसायटीत साहिल सोलर शॉपी नावाचे दुकान आहे. या भागात संशयीताची दहशत असून तो परिसरातील व्यावसायीकांकडून नियमीत खंडणी वसूली करतो. थेट जीवे मारण्याची धमकी देत असल्याने शिंगणे यांनीही प्रारंभी वेळोवेळी त्यास खंडणी दिली. दोन दिवसांपूर्वी दोन हजार रूपये घेवून गेलेला असतांना गेल्या सोमवारी (दि.८) संशयीताने पुन्हा शिंगणे यांना दुकानात गाठले. यावेळी त्याने जास्तीच्या रकमेची मागणी केली असता शिंगणे यांनी नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या संशयीताने कोयत्याचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत शिंगणे आणि शेजारच्या दुकानात शिरून धुडघूस घालत दुकानांची तोडफोड केली. दुस-या दिवशी शिंगणे यांची मालवाहू टेम्पो दुकानासमोर उभा असतांना संशयीताने त्याचीही तोडफोड केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे करीत आहेत.
……