नाशिक – शहरातील वेगवेगळ्या भागात राहणा-या तीघांनी बुधवारी (दि.२) गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात दोन विवाहितांसह एका १८ वर्षीय युवकाचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी देवळाली कॅम्प, आडगाव आणि अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नानेगाव ता.जि.नाशिक येथील जेरीना आनंद म्हत्रे (२५ रा.संपत आडके यांच्या घरात) या विवाहीतेने बुधवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील लाकडी आड्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. ही घटना पती आणि मुले सकाळी उठल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी हिरामण आडके यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार ढोन्नर करीत आहेत.
दुसरी घटना धात्रक फाटा परिसरात घडली. सविता श्रीकृष्ण अभंग (रा.हरिओम रो हाऊस,सागर व्हिलेज) या विवाहीतेने बुधवारी सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बस्ते करीत आहेत.
तर हितेश दीपक जाधव (१८ रा.अक्षय चौक,पवननगर सिडको) या युवकाने बुधवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या वरील मजल्यावरील आपल्या रूममध्ये छताच्या हुकाला नॉयलान दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी चुलत भाऊ मुकूल जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.