नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वार ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. याप्रकरणी पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
उड्डाणपुलावर अपघात
महामार्गावरील अपोलो हॉस्पिटल समोरील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात संदिप रामचंद्र पारधी (२५ रा.गोलटेंभी – शिलापूर जि.नाशिक) हा युवक ठार झाला.गुरूवारी (दि.२५) रात्री हा अपघात झाला. पारधी व त्याचा मित्र मित्र गोरख संजय बर्वे (२७ रा.गोलटेंभी – शिलापूर) द्वारकाकडून आडगावच्या दिशेने प्रवास करीत असतांना भरधाव दुचाकी (एमएच ०४ सीसी १८५७) दुभाजकावर आदळली.
या अपघातात पारधी याचा मृत्यु झाला तर गोरख बर्वे जखमी झाला असून मद्यधुंद चालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
औरंगाबादरोडवर धडक
दुसरा अपघात औरंगाबादरोडवर झाला. नांदूरनाक्याकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एमएच ४६ एन ३०१०) पुढे जाणा-या डिस्कव्हर (एमएच १२ ईवाय ९५५३) या दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने सुजय शशिकांत साळवे (१७ रा.आगर टाकळी) हा अल्पवयीन मुलगा ठार झाला. या अपघातात सुजयचा मित्र गुलशन कुमावत जखमी झाला आहे.
हा अपघात गुरूवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास झाला. दोघे मित्र आपल्या दुचाकीवर नाशिकच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. याप्रकरणी सुजय चे वडिल शशिकांत साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात कारचालक रिझवान रफिक सय्यद (रा.विंचूर ता.निफाड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.