नाशिक : शहर व परिसरात अपघाताचे सत्र सुरूच असून नुकत्याच वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी पंचवटी,गंगापूर,भद्रकाली,सातपूर आणि देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पेठरोडवर मंगळवारी (दि.२३) रात्री झालेल्या अपघातात धोंडू पांडूरंग गवळी (६० रा.शेषराव मंदिराजवळ,फुलेनगर) हे वृध्द पादचारी ठार झाले. सोमवंशी दवाखान्यासमोर गवळी रस्ता ओलांडत असतांना भरधाव अॅक्टीव्हाने (एमएच १५ जीबी ४५५२) त्यांना धडक दिली. या घटनेत गवळी जखमी झाल्याने मुलगा दीपक गवळी याने त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अतुल तुकाराम बैताडे (रा.लक्ष्मीनारायण मंगल कार्यालया जवळ,कुमावतनगर) या दुचाकीस्वाराविरूध्द पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
दुसरा अपघात सातपूर औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात झाला. या अपघातात बाळनाथ भागाजी खैरणार (५६ रा.जिजामाता कॉलनी,शिवाजीनगर) हे पादचारी जखमी झाले. खैरणार मंगळवारी (दि.२३) ध्रुवनगर येथील सत्यम वाईन्स समोरून पायी जात असतांना अॅक्टीव्हाने त्यांना धडक दिली. या अपघातात खैरणार जखमी झाले असून मुलगा किशोर खैरणार याच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार अनिकेत नरेंद्र लोखंडे (रा.आयोध्या कॉलनी शिवाजीनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक चौधरी करीत आहेत. तिसरा अपघात द्वारका परिसरातील सर्व्हिस रोडवर झाला. या अपघातात मिराबाई किसन गाडेकर (५९ रा.ओझर मिग,ता.निफाड) या जखमी झाल्या गाडेकर या ओझर बस थांब्यावर जात असतांना हा अपघात झाला. द्वारका परिसरातील हॉटेल फेमस समोरील सर्व्हिस रोडने त्या पायी जात असतांना ओझर बाजूकडून भरधाव येणाºया दुचाकीने (एमएच १५ एचए ९६४१) त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायास मोठी दुखापत झाली असून याबाबत त्यांनी चालकास जाब विचारला असता ट्रिपलसिट असलेल्या दोघा महिलांनी त्यांना दमदाटी व शिवीगाळ करीत अपघाताची खबर न देता पोबारा केला. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार भालेराव करीत आहेत.
त्र्यंबकरोडवर झालेल्या अपघातात चेतन अशोक कोतकर (३५ रा.उत्तमनगर,सिडको) हा युवक जखमी झाला. कोतकर बुधवारी (दि.२४) त्र्यंबकरोडवरील आयबीज हॉटेल समोर रस्ता ओलांडत असतांना त्यास भरधाव दुचाकीने धडक दिली.या अपघातात कोतकर जखमी झाला असून याप्रकरणी एमएच १५ सीई ६५०८ वरील चालकाविरूध्द सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. तर वडनेर रोडवरील नवीन बस स्टॅण्ड भागात झालेल्या अपघातात रमेश सरदारसिंग परदेशी (५३रा.बोथलेनगर,नाशिक पुणे रोड) हे जखमी झाले. परदेशी गेल्या शुक्रवारी (दि.१९) देवळाली कॅम्प येथे गेले होते. एमएच १५ सीएन ६३७३ या दुचाकीने ते आर्मि स्टेशन हेड क्वार्टर येथून डेअरी फार्मच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नवीन बसस्थानक भागात डेअरी फार्म कडून त्रिमुर्ती चौकाकडे भरधाव जाणाºया (एमएच १५ जीसी ६६७८) या दुचाकीस दुध किटल्या ठेवण्यासाठी लावलेली लोखंडी जाळी त्यांच्या पायाला लागल्याने ते जखमी झाले. या अपघातात बेदारक दुचाकीची लोखंडी जाळी लागल्याने परदेशी यांचा पाय मोडला असून याप्रकरणी विकास विठ्ठल जारस (४० रा.लहवित ता.जि.नाशिक) या दुचाकीस्वाराविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पानसरे करीत आहेत.