नाशिक : मुदत संपलेल्या वीमा पॉलीसी धारकास मोबाईलवर संपर्क साधून भामट्यांनी सहा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मुळ रक्कम पदरात पाडण्यासाठी पॉलीसी धारकास वेळोवेळी बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून हा गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक महाजन,रोहन,प्रिया आणि प्रतिभा शर्मा व सुभाष अशी गंडा घालणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप तितारे (३४ रा. शाहूनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. तितारे यांनी एचडीएफसी या बँकेची विमा पॉलीसी घेतली आहे. या पॉलीसीची मुदत संपण्यापूर्वीच संशयीतांनी १६ मे ते १ आॅक्टोबर दरम्यान संपर्क साधून हा गंडा घातला आहे. ७ लाख ३० हजार रूपयांची विम्याची रक्कम पदरात पाडण्यासाठी संशयीतांनी तितारे यांचा मोबाईल नंबर मिळवून संपर्क साधला होता. एचडीएफसी बँक कर्मचारी असल्याचे भासवून संशयीतांनी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना बँक खात्यात आॅनलाईन पैसे भरण्यास भाग पाडले. या काळात तितारे यांनी तब्बल ६ लाख १० हजाराची रक्कम भरली. कालांतराने संशयीतांचा संपर्क तुटल्याने आपली फसवणुक झाल्याची लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक संतोष खडके करीत आहेत.