नाशिक : विवाह सोहळ्यातून रोकडसह लाखोंच्या अलंकारांवर डल्ला मारणारे परप्रांतीय त्रिकुट पोलीसांच्या हाती लागले आहे. इंदूर येथे तब्बल तीन दिवस तळ ठोकत या त्रिकुटास बेड्या ठोकण्यात आल्या आहे. संशयीतांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह सात लाख बारा हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. लहान मुलांच्या माध्यमातून बॅगलिफ्टींग करणारी ही मोठी टोळी असल्याचे बोलले जात आहे. मध्यप्रदेशातून येऊन विवाह सोहळयांना लक्ष ती करत होती. ही कारवाई शहर गुन्हेशाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
अटक करण्यात आलेल्यामध्ये अजयसिंग कप्तानसिंग कोडान उर्फ सिसोदिया (२५) बादल क्रिष्णा सिसोदिया (१९), पर्वतसिंग मिस्त्रीलाल सिसोदिया (४५ रा. सर्व गुलखेडी, राजगड, मध्यप्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. गेल्या काही दिवसात शहरातील विविध मंगलकार्यालय तसेच लॉन्स मध्ये झालेल्या लग्न सोहळ्यांमध्ये चो-या वाढल्या आहे. सप्तपदी किंवा मंगलाष्टक प्रसंगी व्यासपीठावर जमलेल्या वधू वर पक्षाच्या अथवा नातेवाईकांचे रोकड व दागिणे असलेल्या बॅगा भामटे हातोहात लांबवत होते. अशा घटना वारंवार घडत असल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास मिळालेल्या माहिती वरून ही कारवाई करण्यात आली. मध्यप्रदेशातील टोळी महाराष्ट्रातील नाशिकसह अन्य शहरामध्ये येवून अश्या प्रकारच्या चो-या करीत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ चे पथक इंदौर येथे रवाना झाले होते. तब्बल तीन दिवस तळ ठोकत पोलीसांनी त्रिकुटास बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारसह एमएच ०४ टीसी १३३२ तीन मोबाईल असा सुमारे ७ लाख १२ हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. संशयीत टोळी अल्पवयीन मुलांना विवाहस्थळी पाठवून त्यांच्या मार्फत बॅग लिफ्टींग करीत असल्याचे वास्तव समोर आले आहे. संशयीतांची मोठी टोळी असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. दरम्यान या त्रिकुटाने २४ डिसेंबर रोजी सोमेश्वर परिसरातील बालाजी लॉन्स मध्ये सुरू असलेल्या विवाह सोहळयातून सुमारे दीड लाख रूपये किमतीचे दागिणे पळविल्याची कबुली दिली आहे. याबरोबर या टोळीने मुंबई, पुणे, सांगली कोल्हापूर,संगमनेर या शहरासह गुजरात राज्यातील तलासरी,सुरत, वापी उत्तरप्रदेशातील लखनौ,कानपूर आदी ठिकाणी विवाह सोहळयांमधून बॅग लिफ्टींग केल्याचे पुढे आले आहे. संशयीतांना गंगापूर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना मंगळवार (दि.५) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक महेश कुलकणी,रघुनाथ शेगर,हवालदार येवाजी महाले,संजय मुळक,वसंत पांडव पोलीस नाईक विशाल काठे,मोतीराम चव्हाण,आसीफ तांबोळी,शिपाई राहूल पालखेडे,विशाल देवरे,गणेश वडजे,समाधान पवार,निलेश भोईर,गौरव खंडारे आदींच्या पथकाने केली.