नाशिक – ओझर येथील विमानतळावरुन सुरू असलेल्या विमानसेवेला मोठा प्रतिसाद भेटत असल्याने स्पाईस जेट या आघाडीच्या कंपनीने दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे नाशिकच्या विकासाला आणखी वेग मिळणार आहे.
सद्यस्थितीत ओझर विमानतळावरुन अलायन्स एअरची नाशिक-पुणे, नाशिक-हैदराबाद, नाशिक-अहमदाबाद, ट्रुजेट कंपनीची नाशिक-अहमदाबाद, स्टार एअरची नाशिक-बेळगाव, स्पाईसजेट कंपनीची नाशिक-बंगळुरु आणि नाशिक-नवी दिल्ली या सेवा सुरू आहेत.
सद्यस्थितीत नाशिक – नवी दिल्ली ही सेवा आठवड्यातील केवळ ४ दिवसच आहे. मात्र, या सेवेला असलेला उत्तम प्रतिसाद पाहता ही सेवा आता आठवड्यातील सातही दिवस करण्याचा निर्णय स्पाईसजेट कंपनीने घेतला आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीशी नाशिककर सातही दिवस जोडले जाणार आहेत. येत्या १ एप्रिलपासून नाशिक-दिल्ली सेवा सातही दिवस होणार आहे.
त्याशिवाय स्पाईसजेट कंपनीने उडान या योजनेव्यतिरीक्त नाशिकशी आणखी एका शहरासाठी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक ते कोलकाता ही सेवा सुरू होत आहे. विशेष म्हणजे ही सेवा सोमवार ते शनिवार अशी सहा दिवस राहणार आहे. ही सेवा येत्या २९ मार्चपासून सुरू होणार आहे. या सेवेचे बुकींग कंपनीने सुरू केले आहे.