नाशिक – ओझर येथील विमानतळावर सुरू झालेल्या हवाई सेवेद्वारे आपण अनेक शहरांशी जोडले जाऊ शकतो. नाशिकच्या हवाई सेवेच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक शहरांशी नाशिक शहर जोडले गेले आहे. सध्या आपण नाशिक येथून विमानाने दिल्ली, बंगळुरू, हैद्राबाद , पुणे व अहमदाबाद येथे डायरेक्ट विमानाने जाऊ शकतो. यापैकी अहमदाबाद व हैद्राबादसाठी दोन वेळा उड्डाण आहे तर बाकी शहरांसाठी एकदा उड्डाण होते.
या नियमित सेवेव्यतिरीक्त हाॅल्टेड फ्लाईट (एका ठिकाणी उतरून पुन्हा पुढे जाणे) घेतल्यास अजून किमान २० वेगवेगळ्या शहरांना विमानाने पोहचणे शक्य आहे. यात प्रामुख्याने दिल्ली येथे छोटासा ब्रेक घेऊन दुबई येथे पोहचता येते. तसेच अमृतसर, पाटणा, दरभंगा, डेहराडून, गोरखपूर, जम्मू, गुवाहाटी, उदयपुर, वाराणसी, लेह अशा शहरांना जोडले गेलो आहोत. तसेच अहमदाबाद येथे ब्रेक घेतल्यास कांडला, जैसलमेर, राजकोट, पोरबंदर व बंगळुरू किंवा हैदराबाद येथे ब्रेक घेतल्यास कोची, कोलकाता, तिरुपती, चैन्नई, विशाखा पट्टणम, त्रिवेंद्रम या शहरांना जाता येते, अशी माहिती पर्यटन व्यावसायिक दत्ता भालेराव यांनी दिली आहे.
विमानसेवेमुळे नाशिक देशाच्या जवळपास सर्वच प्रमुख विभागांना जोडले गेले आहे. याचा मुख्य फायदा नाशिकच्या औद्योगिक व पर्यटन व्यवसायास होत आहे. तसेच सध्या असलेल्या फ्लाईटसला व्यवस्थित प्रतिसाद लाभल्यास भविष्यात गोवा, चेन्नई, कोलकाता, जम्मू या शहरांसाठी डायरेक्ट फ्लाईटस सुरु होऊ शकतील, असेही भालेराव यांनी सांगितले आहे.