नाशिक – वाहन थांबवल्याचा राग आल्याने एकाने वाहतूक पोलिसास मारहाण केल्याची घटना इंदिरानगर बोगद्याजवळ घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात संशयित नारायण लक्ष्मण सुर्यवंशी (४०, रा. गोविंदनगर झोपडपट्टी) याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई शंकर नामदेव दातीर यांच्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.१०) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास संशयित नारायण सुर्यवंशी हे एमएच १५ एचई ६५९९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन येत असताना दुचाकीचालकाने समोरील वाहनास कट मारला. त्यामुळे दातीर यांनी त्यांचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या सुर्यवंशी यांनी दातीर यांना शिवीगाळ, मारहाण करीत सरकारी कामात अडथळा आणला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस तपास करीत आहेत.