वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघा नातेवाईकांना चार जणांच्या टोळक्याकडून बेदम मारहाण
नाशिक : आतेभावाचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघा नातेवाईकांना चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना फुलेनगर येथील मायको दवाखाना भागात घडली. या घटनेत एकावर चॉपरने वार करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोकुळ येलमामे,रविंद्र आहिरे,सोनू वारूंगसे आणि गोपाल उर्फ गोपी गोरे (रा.सर्व कालीकानगर,पंचवटी) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी अजय विश्राम मोहिते (रा.मायको दवाखान्यामागे,फुलेनगर) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. मोहिते व त्याचा नातेवाईक अनिल आठवले हे दोघे रविवारी (दि.२१) रात्री मार्केट यार्ड येथील काम आटोपून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. मायको दवाखान्याजवळ मोहिते याचा आतेभाऊ सोनू डॅनियल खंदारे यास रविंद्र आहिरे मारहाण करीत असल्याने दोघे नातेवाईक खंदारे याच्या मदतीला धावून गेले असता ही घटना घडली. भावास मारहाण केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघा नातेवाईकांना गोकुळ येलमामे,रविंद्र आहिरे,सोनू वारूंगसे व गोपाळ उर्फ गोपी गोरे आदींनी शिवागाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी वारूंगसे याने कमरेला खोचलेला चॉपर काढून खंदारे याच्यावर वार करून जखमी केले. अधिक तपास जमादार मिसाळ करीत आहेत.
….
नऊ जणांच्या टोळक्याने दोन जणांवर प्राणघातक हल्ला
नाशिक : नऊ जणांच्या टोळक्याने दोन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सामनगाव रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरात घडली. या घटनेत धारदार शस्त्रासह लोखंडी रॉडचा वार करण्यात आल्याने दोघे मित्र जमी झाले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच भागात लहान मुलांच्या भांडणावरून एकावर कोयत्याने वार करण्यात आले असून चार जणांच्या टोळक्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत नवनाथ बाबादेव पंडीत,राम मोतीराम मोरे,मन्या कैलास डोगले,आकाश सुनिल बाविस्कर,श्याम मोतीराम मोरे,सागर रामदास पगारे,अज्जू बाळू निळे,कुणाल सुर्यवंशी व दादू शांताराम चौधरी (रा.सर्व अश्विनी कॉलनी,सामनगावरोड) अशी दोघा मित्रांवर प्राणघात हल्ला करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी संदिप जगन पिंपळे (२३ रा.प्रकाश नगर,अश्विनी कॉलनी) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. पिंपळे रविवारी (दि.२१) रात्री म्हाडा कॉलनीतील गेट नं.२ समोर मोबाईलवर बोलात असतांना ही घटना घडली. संशयीत टोळक्याने विशाल पवारचा हा मित्र आहे असे म्हणून पिंपळे यास बेदम मारहाण केली. या घटनेत कोयत्याचा वार करण्यात आल्याने जखमी अवस्थेत पडलेला असतांना पिंपळे याने दवाखान्यात घेवून जाण्यासाठी मित्र योगेश आहेर यास फोन करून बोलावून घेतले असता संशयीत टोळक्याने त्यासही बेदम मारहाण केली. यावेळी आहेर याच्यावरही कोयत्याने वार करण्यात आला. दुसरी घटना याच भागात रविवारी रात्री घडली. सागर रामदास पगारे (रा.अश्विनी कॉलनी) याने तक्रार दाखल केली आहे. योगेश आहेर,जितेश उर्फ छोटू जाधव,विजय भालेराव आणि विवेक जाधव आदींनी तु लहान मुलांच्या भांडणात का पडतो या कारणातून कुरापत काढून लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी या भागातील आम्ही भाई आहोत असे म्हणून टोळक्याने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याचे म्हटले आहे. दोन्ही घटनांचा तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
……