नाशिक : वडाळा नाका येथील खून आणि दंगल प्रकरणात पसार झालेल्या दोघांपैकी मुख्य संशयीतास बेड्या ठोकण्यात पोलीसांना यश आले आहे. मुंबईत संशयीतास जेरबंद करण्यात आले आहे. दोन गटात उसळलेल्या दंगलीत चाकू आणि चॉपरसारख्या धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आल्याने एकाचा मृत्यु झाला तर एक जण जखमी आहे. याप्रकरणी नऊ जणांविरूध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,अद्याप एक संशयीत फरार आहे.
विशाल सुनिल बेनवाल असे अटक केलेल्या मुख्य संशयीताचे नाव आहे. तर मनिष विक्रम डुलगज अद्याप फरार आहे.पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार पवन टाक,सतिश टाक,निखील टाक,अभय बेनवाल,हरिश पवार,शिवम पवार आकाश टाक (रा.सर्व महालक्ष्मी चाळ) आदी सात संशयीतांना घटनेनंतर तात्काळ जेरबंद करण्यात आले असून, विशाल बेनवाल आणि मनिष डुलगल पसार झाला होता. महालक्ष्मी चाळीत सोमवारी रात्री दोन गटात वाद सुरू होता. यावेळी संशयित विशाल बेनवाल व त्याच्या साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवून करण राजू लोट व आकाश संतोष रंजवे यांना पोलीसांचे खबरी असल्याच्या संशयातून धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या घटनेत आकाश रंजवे या युवकाचा मृत्यु झाला तर करण लोट जखमी आहे. घटनेनंतर पोलीसांनी शोध कार्य हाती घेत सात जणांना बेड्या ठोकल्या होत्या तर मुख्यसंशयीतास मुंबईत जेरबंद करण्यात आले असून मनीष दुलगज अद्यापही फरार असून त्याच्या मागावर पोलीस आहेत. पसार झालेल्या संशयीत लवकरच पोलीसांच्या हाती लागेल असा विश्वास वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.
पवन टाक यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरूध्द गटातील अर्जुन लोट यास अटक करण्यात आली असून, पोलीसात दिलेल्या तक्रारीच्या कारणातून संशयीत अर्जुन लोट,करण लोट व लक्ष्मी लोट आदींनी पवनचा भाऊ आकाश टाक यास पकडून ठेवत डोक्यात दगड घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.
……….
तडीपारीचा गुन्हेगारास कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश
नाशिक : तडीपारीचा आदेश मोडून शहरातच वास्तव्य करणा-या सराईत गुन्हेगारास पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. गोविंदा संजय साबळे (२०, रा. भोरमळा, जुना सायखेडा रोड) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गोविंदा विरोधात एम. पी. डी. ए. कायद्यातंर्गत कारवाई केली आहे. शहरातील टोळीयुद्ध व गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस आयुक्त पाण्डेय यांनी गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. गोविंदा याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास तडीपार करण्यात आले होते. तरीदेखील तो न्यायालयाची किंवा पोलिसांची पुर्वपरवानगी न घेताच शहरात वास्तव्य करीत असल्याचे आढळून आले. त्याचे गुन्हेगारी कृत्य वाढतच असल्याने तसेच त्याच्या वर्तणूकीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने त्याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. त्यास नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
……….
ट्रॅक्टरने धडक दिल्याने ४३ वर्षीय पादचारी ठार
नाशिक : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने ४३ वर्षीय पादचारी ठार झाला. हा अपघात जेलरोड येथील पाण्याच्या टाकी परिसरात झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कांतीलाल पांडूरंग फासगे (रा.श्रमिकनगर,जेलरोड) असे अपघातात ठार झालेल्या पादचाºयाचे नाव आहे. फासगे बुधवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास जेलरोड येथील पाण्याच्या टाकींकडे रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. लाकडाची वखार भागात पाठीमागून भरधाव येणाºया ट्रॅक्टरने फासगे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने चुलत भाऊ सतीष फासगे यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
..