वकिलवाडीत पाठलाग करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना
नाशिक : कार आणि दुचाकीवर आलेल्या टोळक्याने दोघांचा पाठलाग करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना वर्दळीच्या वकिलवाडीत घडली. या घटनेत लाठ्या काठ्यांसह चॉपरचा वापर करण्यात आल्याने एक युवक जखमी झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तिघांना बेड्या ठोकल्या असून त्यांचा एक साथीदार अद्याप पसार आहे.
सिध्देश सोनार, किशोर वाकोडे,दिपांशू आव्हाड अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे असून अमृत भास्करे हा संशयीत अद्याप पसार आहे. याप्रकरणी लौकिक प्रशांत लुले (२६ रा.काळाराम मंदिरामागे) याने तक्रार दाखल केली आहे. लुले व त्याचा मित्र शुभम दाते बुधवारी (दि.७) रात्री महात्मा गांधी रोडवरील श्याम सिल्क साडी दुकानासमोर बसलेले असतांना ही घटना घडली. शुभम दाते आणि रितेश सोनार यांच्यात झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी दुचाकी आणि कारमधून आलेल्या संशयीतांच्या टोळक्याने हातात लाठ्या काठ्या व चॉपर घेवून दोघा मित्रांचा पाठलाग केला. दोघे मित्र वकिलवाडीतून जीव वाचविण्याच्या प्रयत्नात पळत असतांना टोळक्याने निलेश ड्रायफुड दुकानासमोर लौकिक लुले यास गाठून त्याच्यावर चॉपरने वार करीत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला असून पोलीसांनी तिघांना अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक काकविपुरे करीत आहेत.
……
विहीतगाव कॉर्नर सिग्नल भागात प्राणघातक हल्ला
नाशिक : मागील भांडणाची कुरापत काढून चार जणांच्या टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना विहीतगाव कॉर्नर सिग्नल भागात घडली. या घटनेत तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने तो जखमी झाला असून,याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू शेख,हर्ष उन्हवणे,कपील डगळे,विशाल शिंदे (रा.बागुलनगर,विहीतगाव) अशी तरूणावर प्राणघात हल्ला करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी राहूल हांबरे (रा.विहीतगाव) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. हांबरे याचा मित्र पंकज भास्कर चंद्रमोरे हा बुधवारी (दि.७) रात्री विहीतगाव कॉर्नर येथील सिग्नल परिसरातून जात असतांना टोळक्याने त्यास गाठले. यावेळी टोळक्याने मागील भांडणाची कुरापत काढून त्यास जिवे मारण्याच्या उद्देशाने संशयीत सोनू शेख याने त्याच्या काना मागे धारदार शस्त्राने वार केला. तर उर्वरीतांनी लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यास जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
….