नाशिक : गंगापूररोडवरील कवडे गार्डन लॉन्समधून देखील गुरुवारी (दि. १७) एक पर्स चोरीला गेली असून त्यात १ लाख ६ हजार रुपयांची रोकड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, मोबाइल व इतर कागदपत्र असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी विलास फकिरराव ताजणे (रा.ओझर, ता. निफाड) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभ सुरू असताना फिर्यादी यांची पत्नी कमल ताजणे यांनी त्यांची पर्स लॉन्समधील एका खुर्चीवर ठेवली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून ही बॅग चोरून नेली. त्यात ५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल, १ लाख ६ हजार रुपयांची रोख रक्कम, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ६ एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, मतदान कार्ड असा एकूण १ लाख १६ हजार ५०० रुपयांची ऐवज होता. याप्रकरणी पोलीस नाईक के. एम. भडिंगे तपास करत आहे.लग्न समारंभात दागीने, रोख रक्कम चोरीचे जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
लॉन्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
चोरीच्या घटना घडत असल्यामुळे लॅान्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पोलीस प्रशासनाने लॉन्स चालकांना दिल्या आहे. मात्र, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने गर्दीचा गैरफायदा घेत चोरटे व-हाडींना लुटत असल्याचे प्रकार समोर येत आहे.
———————
नाशिक : भरधाव वेगाने जाणा-या हायवा डंपरने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले. या प्रकरणी युवराज धोंडिराम हुलगुंडे (रा. शिलापुर, नाशिक) याने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. १८) रात्री पावनेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी युवराज व त्याचा मित्र विलास थोरात हे दोघे जण मोटारसायकल क्र. (एमएच १५ जीएन ४१०४) वरून लाखलगावकडून शिला पुरकडे जात होते. यावेळी ओढा गाव परिसरात असताना डंपर क्र. (एचएच १५ जीव्ही ५६५५) ने मोटारसायकलला धडक दिली. याप्रकरणी हवालदार गांगुर्डे तपास करत आहे.
————-
नाशिक : घराबाहेर ओट्यावर ठेवलेला मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी इरफान असगर शेख (रा. सिन्नरफाटा) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी इरफान खान यांचा मुलगा बिलाल हा घराबाहेर मोबाइल खेळत होता. यावेळी मोबाइल बोहर ठेवून तो घरात आला असता अज्ञात चोरट्याने त्यांचा १० हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला.
———
नाशिक : पिकअपने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पिकअपमधील एकाच मृत्यू तर एक जण जखमी झाला. याप्रकरणी दीपक अंबादास इप्पर (रा. पंचवटी) याने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअपच चालक संशयित किरण प्रकाश शेवकर (पत्ता माहिती नाही) याचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. १९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चालक किरण शेवकर हा पिकअप क्र. (एमएच १५ जीव्ही ९८८७) घेवून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येत होता. यावेळी विल्होळी जकात नाका परिसरात पिकअपने समोरील कंटेनरला क्लिनर बाजूने जोरदार धडक दिली. त्यामुळे पिकअपमध्ये बसलेला फिर्यादी दीपक इप्परचा भाऊ किरण इप्पर हा जखमी झाला व विनोद विजय आव्हाड यांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे देखील नुकनास झाले.
———-
नाशिक : घंटागाडीने युवतीस चिरडल्याच्या घटनेला चार दिवसांचा कालावधी होत नाही तोच, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सायकलवरून जाणा-या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सातपुर परिसरात घडली आहे. निखिल अमित पाटील (वय १६, रा. महादेववाडी, सातपुर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी सातपुर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार (दि. १८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निखिल सायकलवरून लाइट कंपनीसमोरून जात होता. यावेळी पांढ-या रंगाच्या अज्ञात कारने धडक दिल्याने निखिलच्या डोक्याला दुखापत झाली. उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी करून निखिलला मृत घोषित केले.