नाशिक : मुलास लष्करात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने एकाने महिलेस सहा लाखास गंडा घातल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत भामट्याने बनावट नियुक्तीपत्र पाठवून महिलेस हा गंडा घातला असून महिलेच्या तगाद्यामुळे त्याने ५० हजाराची रोकडही परत केली आहे. मात्र उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीराजु शंकर आहिरे (रा. समृध्दी पॅलेस अपा. विवेकानंद नगर मखमलाबादरोड, मुळ रा. वाखारी पिंपळगाव, ता. देवळा)असे संशयिताचे नाव आह. याप्रकरणी हिरावाडी परिसरात राहणा-या महिलेने तक्रार दाखल केली आहे. संशयीताने महिलेस गाठून तिच्या मुलास देवळाली कॅम्प येथील आरएमईएस मिलीट्री इंजिनिअरींग या ठिकाणी नोकरीस लावण्याचे आमिष दाखविले. १५ जून २०१९ पासून आजपर्यंत त्याने वेळोवेळी महिलेकडून साडे सहा लाख रूपये घेतले. ही रक्कम रोख आणि धनादेशाद्वारे स्विकारण्यात आली. महिलेने मुलाच्या नोकरीसाठी संशयीताकडे पाठपुरावा केला असता त्याने महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी तिच्या पत्यावर मुलासाठी बनावट नियुक्ती पत्र पाठविले. त्यानंतर पुन्हा महिलेस गाठून त्याने नियुक्ती पत्रात नाव चुकल्याचे सांगून नियुक्तपत्र आपल्या ताब्यात घेतले. वर्ष भराचा काळ उलटल्यानंतर महिलेने तगादा सुरू केला असता त्याने नोकरीचे काम होणार नाही असे सांगून त्याने ५० हजाराची रक्कम परत केली. अनेक दिवस उलटूनही उर्वरीत सहा लाख रूपये परत न मिळाल्याने महिलेने तगादा सुरू केला असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. आर्थिक फसवणुक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पंचवटी पोलीस ठाणे गाठले असून अधिक तपास उपनिरीक्षक कासर्ले करीत आहेत.
……
डीके नगरला महिलेची आत्महत्या
नाशिक : गंगापूररोड भागातील डी.के.नगर भागात राहणा-या २१ वर्षीय महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. चैताली लक्ष्मण सरवार (२१, रा. डी.के. नगर चौक) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी दुपारी सरवार यांनी त्यांच्या राहत्या घरात अज्ञात कारणातून ओढणीच्या सहाय्याने पंख्यास गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याबाबत अमोल नेरकर यांनी खबर दिल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.