परप्रांतीयाकडून महिलेवर बलात्कार
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून एका परप्रांतीयाने महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीताने लग्नास नकार देवून धूम ठोकल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद धर्मेंद्र रावत (रा.ग्वॉलियर,मध्यप्रदेश) असे संशयीताचे नाव आहे. रावत भगूर येथील शाह बिल्डींग जवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामावर कामास होता. गेल्या वर्षी महिला काम शोधण्यासाठी गेली असता त्याने काम लावून देण्याचा बहाणा करून राहत असलेल्या ठिकाणी नेले. २८ फेब्रुवारी २०२० ते १३ फेब्रुवारी या दरम्यान त्याने परिसरात स्व:ताची पत्नी असल्याचे भासवून महिलेस आपल्या राहत्या ठिकाणी ठेवले. या काळात त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने लग्नाचा तगादा लावला असता त्याने पैसे व साक्षीदार नसल्याचे सांगून वेळ मारून नेली. गेल्या वर्षी नवरात्रात तो आपल्या गावी गेला असता त्याने दुस-या महिलेसोबत साखरपुडा केला. ही बाब पिडीत महिलेस समजल्याने तिने विचारणा केली असता त्याने लग्नास नकार देवून तसेच पोलीसात गेलीस तर आईस जीवे ठार मारण्याची धमकी देवून पोबारा केल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोरे करीत आहेत.
……
पेठरोडला महिलेची पोत खेचली
नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी ओरबाडून नेल्याची घटना पेठरोडवरील संत सावतानगर भागात घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना भगवान महाले (रा.गायकवाड मळया जवळ,संत सावतानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. महाले बुधवारी (दि.२४) सायंकाळी कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या. काम आटोपून त्या परिसरातील इंद्रसाई बिल्डींग समोरून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. पाठीमागून दुचाकीवर आलेल्या भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.
…..
अविभक्त मिळकत विक्रीची परस्पर परवानगी
नाशिक : बनावट संमतीपत्राद्वारे अविभक्त मिळकती मधील हिस्सा विक्रीची परस्पर परवानगी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव यांच्याकडून ही मिळकत विक्री परवानगी घेण्यात आली असून याप्रकरणी तीन जणांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. विमलबाई पांडूरंग हिरे,सतिश जनार्दन जाधव (रा.दोघे सातभाई नगर,जेलरोड) व इंदुबाई पांडूरंग हिरे (रा.मुंबई) अशी परस्पर मिळकत विक्रीची परवानगी घेणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी सुनिल लक्ष्मण हिरे (रा.जुनी पोलीस लाईन) यांनी तक्रार दाखल केली आहे. हिरे कुटूंबियांची देवरगाव ता. चांदवड शिवारात गट नं. ४०७ व ४१८ मध्ये एकत्रीत मिळकत आहे. २६ मे २०१७ ते २९ जानेवारी २०१८ दरम्यान संशयीतांनी जेलरोड येथील ए.आय.शेख व एमजीरोड परिसरातील लक्ष्मण लांडगे यांच्या माध्यमातून बनावट नोटरी केली. त्यात सुनिल हिरे व त्यांच्या नातेवाईकांची कुठलीही परवानगी न घेता बनावट संमतीपत्राद्वारे ही परवानगी घेण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार यांच्या बनावट संमतीपत्राच्या आधारे मालेगाव अप्पर जिल्हाधिका-यांनी अविभक्त मिळकतीमधील हिस्सा विक्रीची परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.
…..
निवडणुकीच्या वादातून मारहाण
नाशिक : निवडणुकीच्या वादातून चार जणांच्या टोळक्याने एकास बेदम मारहाण करीत दगडफेक केल्याची घटना पळसे ता.जि.नाशिक येथे घडली. या घटनेत तक्रारदाराच्या खिशीताल १५ हजाराची रोकड गहाळ झाली असून, संशयीतांनी त्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव काशिनाथ आगळे,रावसाहेब उर्फ रामा तानाजी गायधनी,साहेबराव तानाजी गायधनी व ज्ञानेश्वर खंडेराव गायधनी (रा.सर्व पळसे) अशी संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी नवनाथ अंबादास गायधनी (३७ रा.पळसे) यांनी तक्रार दाखल केली आहे. नवनाथ गायधनी बुधवारी (दि.२४) पळसे ग्रामपंचायत कार्यालया जवळ उभे असतांना ही घटना घडली. संशयीतांनी नवनाथ यांना गाठून ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणातून शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत संशयीत रावसाहेब गायधनी याने नवनाथ यांच्या तोंडावर लोखंडी फायटर मारल्याने ते जखमी झाले असून याप्रसंगी नवनाथ यांचे मित्र धनंजय व दिनकर हे त्यांच्या मदतील धावून आले असता संशयीतांनी दगडफेक केली. या मारहाणीत नवनाथ गायधनी यांच्या खिशातील पंधरा हजाराची रोकड पडून गहाळ झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
……