नाशिक : येथील रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने रविवारी गंगापूररोडवरील शंकराचार्य न्याससंकुल पार्किंगमध्ये सेंद्रिय बाजार बरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र अंतर्गत रोटरॅक्ट क्लबच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कोविड-१९ परिस्थितीत मोठ्या प्रमाणत रक्ताची गरज असून या शिबिरातून रुग्णांना रक्ताचा पुरवठा होणार आहे. यासाठी जनकल्याण रक्तपेढी सहकार्य करणार आहे. नाशिककरांनी भाजीपाला, धान्य, फळे खरेदीबरोबरच रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ नाशिक वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो. रोटरी ऑरगॅनिक बाझार हा अन्नदाता ग्रामीण, अल्पभूधारक, गरजू शेतकऱ्यांसाठी आयोजित करीत असलेला नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांचा सेद्रिय पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या भाज्या फळे सुरगाणा तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली स्ट्राॅबेरी थेट कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. याशिवाय अदिवासी व ग्रामीण शेतकरी महिला, बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीची मसाले, सुकविलेल्या भाज्या, लाकडी घाण्याचे तेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ ही उत्पादने देखील या बाजारात उपलब्ध होणार आहेत. नाशिककरांना कोविड-१९च्या परिस्थितीत आपले आरोग्य निरोगी ठेवण्याच्या दृष्टिने हा बाजार फलदायी ठरणार आहे. या दोन्ही उपक्रमांचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, संचालक रोटरॅक्ट, शिल्पा पारख, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा यांनी केले आहे.