नाशिक : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका पोलिस कर्मचा-यासह त्याच्या मित्राने मामा भाच्यास तब्बल १८ लाख रूपयांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेच्या कर्मचा-यासह त्याच्या मित्राविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश मोतीगिरी गोसावी (रा. नाशिक) आणि सचिन भाऊसाहेब म्हस्के (रा. वैजबाभूळ, ता.पाथर्डी, जि-अहमदनगर) अशी या संशयितांची नावे आहे. रमेश गोसावी शहर वाहतूक शाखेत कार्यरत असून या दोन संशयितांनी बाबाजी रामजी केदारे (रा. हनुमाननगर, पंचवटी) आणि त्यांचा भाचा स्वप्निल महेंद्र बागूल यांची फसवणूक केली. रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तसेच बनावट आॅर्डर तयार करून संशयितांनी १ नोव्हेंबर २०१४ ते १२ मे २०१६ या कालावधीत मामा भाच्यांकडून प्रत्येकी ९ लाख असे १८ लाख रुपये उकळले. यातील केदारे यांची ओळख संशयित म्हस्के याच्याशी होती. त्यातूनच हा प्रकार घडला. इस्टर्न रेल्वे, गव्हर्नमेंट आॅफ इंडिया या नावाने संशयितांनी टीसी पदाची बनावट आॅर्डर तयार करून दिली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केदारे यांनी पैशांसाठी तगादा सुरू केला. मात्र, संशयित सातत्याने टाळाटाळ करीत राहिले. अखेर, केदारे यांनी पंचवटी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एम. एस. शिंदे करीत आहेत.
…