रिक्षा प्रवासात महिलेचा विनयभंग
नाशिक : रिक्षा प्रवासात पोलीस रेकॉर्डवरील सराईताने दोघा बहिणींपैकी एकीचा विनयभंग केल्याची घटना त्र्यंबकरोडवर घडली. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवि वाघमारे असे विनयभंग करणा-या सराईताचे नाव असून त्याच्याविरूध्द शहरातील विवीध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पीडित महिला व तिची मावशीची मुलगी या दोन्ही बहिणी सोमवारी (दि.२९) सिडकोत जाण्यासाठी रिक्षा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. ठक्कर बाजार येथून दोघी बहिणी रिक्षात बसल्या होत्या. रिक्षा वेद मंदिरापर्यंत जात नाही तोच सहप्रवासी म्हणून पाठीमागे बसलेल्या संशयीताने एका महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
……
व्यसनमुक्ती केंद्रात मद्यपीची आत्महत्या
नाशिक : व्यसनमुक्त केंद्रांत दाखल केलेल्या पूणे येथील मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील अश्विननगर भागात घडली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
बाबुराव बारसू माकडी (५५ रा.भोसरी – पूणे) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. बाबुराव माकडी हे खासगी कारखान्यात नोकरीस होते. मद्याच्या आहारी गेल्याने ते नोकरीस दांडी मारत असत एवढ्यात अतिमद्यसेवन वाढल्याने कुटूंबियांंनी त्यांना रविवारी (दि.२८) येथील सिडको भागातील मोक्ष व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले असता ही घटना घडली. दुस-या दिवशी सकाळच्या सुमारास सदर व्यक्तीने डबल बेडच्या वरील पाईपाला फाडलेला टोवेल बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच केंद्राचे कर्मचारी नितीन खोडे आणि संतोष सरवणकर यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सखाहरी गारले करीत आहेत.
…..
विषारी औषध सेवन केल्याने एकाचा मृत्यु
नाशिक : उंदीर मारण्याचे औषध आणि सॅनिटायझर सेवन करून ६५ वर्षीय वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना नाशिकरोड येथील दत्तमंदिर भागात घडली. सदर वृध्दाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
दयाल ठाकुरदास आमेसर (६५ रा.आमेसर रेसि.शिवाय कॉलनी) असे आत्महत्या करणा-या वृध्दाचे नाव आहे. आमेसर यांनी सोमवारी (दि. २९) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध आणि सेनिटायझर सेवन केले होते. ही बाब लक्षात येताच कुटूंबियांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
…