रिक्षा प्रवासात पर्स विसरली, पोलिसांनी असा शोधला आरोपी
नाशिक : प्रवासात मुंबईच्या महिलेची पर्स राहील्यानंतर या पर्सचा शोध पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला. या घटनेत रिक्षा चालकाकडून ही पर्स पोलिसांनी हस्तगत करुन त्याला अटक केली. या रिक्षा चालकास न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. या पर्स मध्ये सुमारे ४८ हजार रूपये किमतीचे दागिने होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिरोज इसूफ शेख (रा.वडाळागाव) असे अटक केलेल्या संशयीत रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन अर्जुन सांगळे (रा.ग्रॅडरोड,मुंबई) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच राहणारे सांगळे यांच्यासह त्यांचे बहिण मेव्हणे दिवाळी निमित्त आपल्या गावी आलेले होते. रविवारी (दि.२२) कुटूंबिय परतीच्या प्रवासासाठी द्वारका येथून महामार्ग बसस्थानक दरम्यान रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. वाटेत लहान मुल रडण्यास लागल्याने सांगळे यांच्या बहिणीने हातातील पर्स रिक्षातील आसना मागे ठेवली होती. यानंतर गडबडीत कुटूंबिय महामार्ग बसस्थानकात उतरले त्यानंतर रिक्षाचालक पसार झाला होता. मुंबईच्या दिशेने प्रवास करीत असतांना ही बाब लक्षात आल्याने कुटूंबियांने घोटी येथे उतरूण रिक्षाचालकाचा शोध घेतला. द्वारका रिक्षा थांब्यावरील उपस्थित रिक्षाचालकांच्या मदतीने मोबाईल नंबर मिळवित सांगळे यांनी संशयीताशी संपर्क साधला असता त्याने पर्स नसल्याचे सांगितले होते. अखेर सांगळे यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्याकडे आपबिती कथन केली. पोलीसांनी अवघ्या काही तासात शोध घेवून संशयीतास बेड्या ठोकल्या. प्रारंभी पर्स नसल्याचे सांगून त्याने टाळाटाळ केली मात्र पोलीसी खाक्या दाखविताच त्याने पर्स आपल्या घरात ठेवल्याचे सांगितले. पर्स मध्ये सोन्याचे मंगळसुत्र,बांगड्या,झुमके तसेच लहानमुलांचे सोन्याचांदीचे दागिणे आणि सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू होत्या. पोलीसांनी पर्ससह मुद्देमाल हस्तगत केला असून संशयीतास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास हवालदार रोहिदास सोनार करीत आहेत.
…….
भाऊ भावजाईच्या वादात दिरावर हल्ला
नाशिक : भाऊ भावजाईचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दिरावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना खडकाळी भागात घडली. या घटनेत तरूण दिर जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिध्दार्थ रविंद्र तमखाने,अनिकेत सातपुते,नयन केदारे व भारती केदारे (रा.सर्व खडकाळी) अशी तरूणावर हल्ला करणा-या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी शेखर भारत सोनवणे (२६ रा.खडकाळी) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवारी (दि.२१) रात्री खडकाळी भागात राहणा-या भाऊ आणि वहिणीचा वाद सुरू असल्याची माहिती सोनवणे यास मिळाली होती. त्यामुळे तो त्यांच्या घरी वाद मिटविण्यासाठी गेला असता ही घटना घडली. संशयीतांनी त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी संतप्त अनिकेत सातपुते याने तरूणाच्या डोक्यात लाकडी दांडा मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तरूणाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार ढोली करीत आहेत.
…..
पारिजातनगरला घरफोडी
नाशिक : कुटूंबिय घरात नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून अलंकार चोरून नेल्याची घटना पारिजात नगर येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय रामदास साळुंके (रा.साई हिमांशू रो हाऊस,पारिजातनगर,जेलरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साळुंके कुटूंबिय १६ ते २१ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सुमारे दहा हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
……
अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्दा ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ६५ वर्षीय अनोळखी वृध्द ठार झाले. हा अपघात त्र्यंबकरोडवरील उज्वल फोर्ड शोरूम परिसरात झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
६५ वर्षीय अनोळखी वृध्द रविवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडने पायी जात असतांना हा अपघात झाला. सातपूर कडून नाशिकच्या दिशेने वृध्द पायी जात असतांना पाठीमागून येणा-या अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली होती. या घटनेत वृध्द गंभीर जखमी झाल्याने १०८ रूग्णवाहिकेतून त्यांना जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
…..
दोघांची आत्महत्या
नाशिक : शहरात आत्महत्येची मालिका सुरूच असून रविवारी (दि.२२) वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. सदर इसमांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही याप्रकरणी पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पाथरवटलेन भागात राहणारे अमोल बोराडे (४० रा.अंकित अपा.) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सुनिल वाघ यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक खंबाईत करीत आहेत. तर पेठरोडवरील गावराण हॉटेल पाठीमागे राहणारे देवराम भिका भोये (५० रा.जगन्नाथ प्लाझा अपा.) यांनी रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी ललित भोये यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक फुगे करीत आहेत.
…………..