रिक्षाचालकाकडून एकावर कोयत्याने हल्ला
नाशिक : अॅटोरिक्षा चालक व प्रवाशातील वाद मिटविण्यासाठी गेलेल्या एकावर कोयत्याने हल्ला वार करण्यात आल्याची घटना मेघदूत शॉपींग जवळ घडली. याघटनेत मदतगार जखमी झाला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर छबू निकम (३४ रा.विधातेमळा, मुंबईनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विजय जाधव हा प्रवासी गुरूवारी (दि.१५) मेघदूत शॉपींग परिसरात आले होते. एमएच १५ ईएच २८४२ या रिक्षावरील चालकाशी त्यांचा भाडे आकारणीवरून वाद सुरू असतांना ही घटना घडली. रिक्षाचालक प्रवाशास शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचे बघून निकम वाद मिटविण्यासाठी गेले असता संतप्त चालकाने आपल्या रिक्षातील आसनाखाली ठेवलेला धारदार कोयता काढून निकम यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत निकम जखमी झाले असून अधिक तपास हवालदार पठाण करीत आहेत.
रोकडसह मोबाईलवर चोरट्यांचा डल्ला
नाशिक : द्वारका भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह मोबाईलवर डल्ला मारला. ही घटना काठेगल्लीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैतन्य तुषार इनामदार (रा.काचवाला टॉवर,नवीन रंगूबाई जुन्नरे शाळेजवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे. इनामदार कुटुंबिय गेल्या सोमवारी (दि.१२) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या पाठीमागील ग्रीलचे कुलूप तोडून स्लाईडींग खिडकीमधून घरात प्रवेश करून घरफोडी केली. घरातील बेडरूममधील कपाटातून पाच हजाराची रोकड व मोबाईल असा सुमारे १९ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मोहिते करीत आहेत.