नाशिक – कोरोना संकटामुळे सप्टेंबरपासून सुरू होणारा मतदार नोंदणीचा कार्यक्रम वेळेत होऊ शकला नाही. आगामी निवडणुका पाहता १ जानेवारी २०२१ च्या अहर्ता दिनाकावर १८ वर्ष पूर्ण करण्याऱ्या मतदारांची नोंदणी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यासाठी १५ डिसेंबर पर्यत मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवक मतदारांनी त्वरित मतदार यादीत नोंदणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करत नाशिक शहर व परिसरात विभाग निहाय विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या दरम्यान राज्यात विधानसभा निवडणूक झाली. त्यामुळे एरवी सप्टेंबर महिन्यापासून सुरू होणारा मतदार यादी अद्यावतीकरण आणि विशेष पुनरीक्षण कार्यक्रम या काळात घेता आला नाही. तर पुढील काळात लगेच कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले. परिणामी मतदार यादी मे महिन्यात अंतिम करणे अपेक्षित असताना ती होऊ शकली नाही. त्यामुळे आता राज्य निवडणूक विभागाच्या वतीने राज्यात मतदार नोंदणीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या नुसार २ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यत मतदारांना आपली नाव नोंदणी, पत्ता बदल ,दुरूस्ती, नावात दुरुस्ती करता येईल. १ जानेवारीच्या आहर्ता दिनांकावर ही अंतिम मतदार यादी १५ जानेवारीला प्रसिद्ध होईल. दरम्यान जिल्ह्यात नुकतीच प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर दावे हरकतीं सुरू आहे. यावर सुनावणी होत अंतिम निर्णय घेतल्यानंतर त्याचाही समावेश अंतिम यादीतच समावेश होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी यामध्ये समावेश घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी केले आहे.