रविवार कारंजा भागात वृध्देचे दागिणे व रोकड असा ८५ हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास
नाशिक : भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या वृध्देस एकाने गाठून दागिणे व रोकड असा ८५ हजाराचा ऐवज हातोहात लांबविल्याची घटना रविवार कारंजा भागात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव गणपत बेलगावकर (रा.शनी गल्ली,रविवार पेठ) यांनी तक्रार दाखल केली आहे. बेलगावकर यांच्या वृध्द आई गुरूवारी (दि.८) सकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी रविवार कारंजा भागात गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करीत असतांना एका भामट्याने त्यांना गाठले. साडी व वस्तू देतो असे सांगून भामट्याने वृध्देस एका बँकेजवळ घेवून जात हे कृत्य केले. वृध्देस बोलण्यात गुंतवून संशयीताने सोन्याची पोत आणि चप्पल पिशवीत ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने सोन्याची पोत आणि पाच हजाराची रोकड असा सुमारे ८५ हजार रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. अधिक तपास उपनिरीक्षक कोल्हे करीत आहेत.
………
२७ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून केली आत्महत्या
नाशिक : आडगाव शिवारातील पगार मळा भागात राहणा-या २७ वर्षीय विवाहीतेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर विवाहीतेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शिल्पा पंकज आहेर (रा.टि विंग पार्क साईड होम्स,पगारमळा) असे आत्महत्या करणा-या विवाहीतेचे नाव आहे. शिल्पा आहेर यांनी गुरूवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी भाग्यश्री सुर्यवंशी यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.
…..
पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवली
नाशिक : सामनगाव रोडवरील औटेमळा भागात घराच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण शिवाजी उगले (रा.घरकुल रेसि.) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. उगले यांची होन्डा शाईन (एमएच १५ डीआर ४९८६) ३१ मार्च रोजी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास हवालदार उजागरे करीत आहेत.
..