नाशिक : नाशिक शहरात येवून पार्क केलेल्या मोटारसायकली पळविणा-या मालेगाव येथील टोळीस शहर पोलीसांनी जेरबंद केले. ही टोळी रात्रभर टेहळणी करून पहाटेच्या सुमारास दुचाकी चोरी करायची. खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी मालेगाव येथे जावून, पाच जणांच्या टोळक्यास बेड्या ठोकल्या असून संशयीतांच्या ताब्यातून दोन चोरीच्या आणि एक गुह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
अरबाज मोहम्मद हसन अन्सारी (२१ रा.आयशानगर),मोहम्मद रमजान मोहम्मद इब्राहिम अन्सारी (२२ रा.सुन्नीपुरा,निहालनगर) मोहम्मद आदिल मोहम्मद अजमल अन्सारी (२२ रा.इस्लमाबाद),मोहम्मद तोहिद अहेमद एजाज मोहम्मद अन्सारी (२४ रा.शाबानपुरा) व इम्रान हासरत हुसेन अन्सारी (२५ रा.रमजानपुरा द्याने,मालेगाव) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून पार्क केलेली वाहणे पळविली जात असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. पोलीस चोरट्यांच्या मागावर असतांना युनिट १ चे सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.
विक्री करीत असल्याचे माहिती मिळताच पोलिस मालेगावमध्ये
मालेगाव येथील टोळके शहरात येवून रात्री टेहळणी करीत पहाटेच्या सुमारास मोटारसायकली पळवून नेत असल्याची माहिती मिळाली होती. तसेच संशयीत मालेगाव येथील मनमाड चौफुली भागात ग्राहक शोधून अल्पदरात मोटारसायकली विक्री करीत असल्याचे माहिती मिळताच कुलकर्णी यांचे पथक मालेगाव येथे रवाना झाले होते.पोलीसांनी महामार्गावरील मनमाड चौफुली गाठून सापळा लावत संशयीत टोळक्यास जेरबंद केले.
२ लाख पाच हजाराचा ऐवज पोलीसांनी केला जप्त
संशयीतांच्या ताब्यातून विक्रीसाठी आणलेल्या दोन आणि गुह्यात वापरलेली एक मोटारसायकल तसेच मोबाईल असा सुमारे २ लाख पाच हजाराचा ऐवज पोलीसांनी जप्त केला असून संशयीतांनी भद्रकाली हद्दीतील मोटारसायकल पळविल्याची कबुली दिली आहे. संशयीतांच्या अटकेने भद्रकाली पोलीसांचा एक गुन्हा उघडकीस आला असून अजून काही गुन्हे उघडकीस येतील असा विश्वास पोलीस सुत्रांनी वर्तविला आहे. ही कारवाई उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार,सहाय्यक आयुक्त श्रीमती खन्ना व वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी,रघुनाथ शेगर,जमादार बेंडकुळे,हवालदार नाझीम पठाण,संजय मुळक अनिल दिघोळे,पोलीस नाईक दीलीप मोंढे,मोतीराम चव्हाण,रावजी मगर,मोहन देशमुख,संतोष कोरडे,शिपाई गणेश वडजे,राहूल पालखेडे,प्रविण चव्हाण,विशाल देवरे,विशाल काठे गौरव खांडरे,मुक्तार शेख प्रतिभा पोखरकर आदींच्या पथकाने केली.