नाशिक – मकर संक्रात उत्सवाच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात. यात नायलॉन मांजाचा वापर सर्रासपणे होत असून पक्ष्यांसह माणसांना आपला जीव गमवावा लागत असल्याने अशा धोकादायक मांजाची होळी मुंबई नाका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे उपस्थित होते.
पतंग उडविताना अधिक उत्तम दर्जाचा दोरा वापरण्यासाठी चढाओढ वाढत असल्याने न तुटणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. नायलॉन मांजाच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयानेच बंद लावली असून सूद्धा शहरात छुप्या पद्धतीने याची विक्री केली जात आहे. प्रशासनाकडून दरवर्षी मोठ्या संख्येने नायलॉन मांजा जप्त करण्यात येतो. तरी सुद्धा या मांजाचा वापर कमी होताना दिसत नाही. नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेक अपघात घडत असतात. या अपघातात अनेक नागरिक मृत्यू झाला असून पक्ष्यांच्या मृत्यूंची संख्याही लक्षणीय आहे. नायलॉन मांजा घातक असल्याबरोबरच न तुटणारा असल्याने अनेक जीवघेणे अपघात घडतात. दुचाकी वाहनाने घरी परतत असताना (दि.२८) अचानकपणे पतंगीचा तुटलेला नायलॉन मांजा नोकरदार महिलेच्या गळ्यावर घासला गेल्याने महिलेचा गळा चिरला जाऊन जागीच मृत्यू झाला. अशा अनेक घटना घडत असून नायलॉन मांजा प्रत्येक झाडावर लोंबकळताना दिसतो. या मांजात अनेक पक्षी अडकतात व त्यांचाही मृत्यू होतो. अशा नायलॉन मांजाची छुप्यापद्धतीने विक्री करणाऱ्यांवर व मांजा वापरणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी यावेळी केली.
याप्रसंगी बाळा निगळ, निलेश भंदुरे, विकास सोनवणे, शिवराज ओबेरॉय, जय कोतवाल, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे, नवराज रामराजे, सागर बेदरकर, संतोष जगताप, सम्राट गायकवाड, राहुल कमानकर, अक्षय पाटील, करण आरोटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.