म्हसरूळला टोळक्याचा धुडघूस
नाशिक : परिसरात दहशत माजवित टोळक्याने धुडघूस घातल्याची घटना मखमलाबाद परिसरात घडली. लाठ्या काठ्या हातात घेवून रस्त्यावर उतरलेल्या टोळक्याने नागरीकांना शिवीगाळ करीत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय घोडके,वैभव भडांगे,कमलेश सुराणा,प्रविण जाधव व किरण नामक संशयीत युवकांचा या टोळक्यात समावेश आहे. याप्रकरणी पोपट येवले (रा.हिरावाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. गेल्या शनिवारी (दि.६) रात्री संशयीत टोळक्याने परिसरात दहशत माजविण्यासाठी रस्त्यावर उतरत हे कृत्य केले. स्वामी विवेकानंद नगय येथील गितगंगा सोसायटी परिसरातील पाण्याच्या टाकी जवळून निघालेल्या या टोळक्याने गैरकायद्याची मंडळी जमवित मखमलाबाद,आळंदी कॅनल रोडवर असलेल्या खंडेराव मंदिरापर्यंत हातात लाठ्या काठ्या घेवून दहशत माजविली. वाटेत दिसणा-या नागरीकांनी शिवीगाळ व दमदाटी करीत मनपाचे स्ट्रीट लाईट त्याचे बॉक्स आणि वायरींग तोडून सरकारी मालमत्तेचे सुमारे चार हजार रूपयांचे नुकसान केले. एवढ्यावरच न थांबता या टोळक्याने परिसरात दबदबा निर्माण व्हावा या उद्देशाने अनेक घरांच्या दिशेने दगड फेक करीत रिकाम्या भूखंडावरील गवत जाळून नुकसान केले. अधिक तपास हवालदार संजय राऊत करीत आहेत.
….
रिक्षा प्रवासात महिलेची पोत खेचली
नाशिक : रिक्षातून प्रवास करणा-या महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना मंडलीक मळा भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजना दत्तात्रेय पवार (रा.तुळजा भवानी नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार या बुधवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास मावस सासूला सोबत घेवून घराकडे जाण्यासाठी रिक्षातून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. मंडलीक मळयातील आर.के.ग्लोरी या इमारती जवळ पाठीमागून येणा-या दुचाकीस्वारांनी त्यांना मावशी असा आवाज देवून पोत हिसकावून नेली. आवाज दिल्याने रंजना पवार यांनी अॅटोरिक्षातून डोकावून बघितले असता पाठीमागे बसलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळयातील सुमारे ३५ हजार रूपये किमतीचीी सोन्याच्या पट्टीची पोत खेचून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चोपडे करीत आहेत.
…….
टोळक्याकडून सासरा जावयास मारहाण
नाशिक : घरासमोर काय गोंधळ लावला या कारणातून चार जणांच्या टोळक्याने सासरा जावयासह भाच्यास बेदम मारहाण केल्याची घटना सिडकोतील शिवशक्तीचौकात घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गणपत घारे,गोकुळ गणपत घारे,ललित राजू हिरे,निवृर्ती राजू हिरे (रा.सर्व मिनाताई ठाकरेनगर,शिवशक्तीचौक) अशी मारहाण करणा-या संशयीत टोळक्याचे नाव आहे. याप्रकरणी विजय रंगनाथ त्रिभुवन (रा.नवजीवन शाळे मागे,मिनाताई ठाकरे नगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्रिभुवन यांचा मुलगा,जावई व भाचा हे तिघे जण रविवारी (दि.७) रात्री आपल्या घरासमोर गप्पा मारत असतांना ही घटना घडली. शेजारी राहणा-या संशयीत टोळक्याने घरासमोर काय गोंधळ लावला या कारणातून मुलगा व जावयाशी वाद घातला. यावेळी त्रिभुवन समजून सांगत असतांना टोळक्याने शिवीगाळ करीत सासरा जावयासह भाच्यास बेदम मारहाण केली. यावेळी विजय व गोकुळ घारे यांनी त्रिभुवन यांचा भाचा गणेश जाधव यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले तर ललित व निवृत्ती हिरे यांनी जावई नागेश जाधव यांच्या तोंडावर हातातील फरशीचा तुकडा मारल्याने ते जखमी झाले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
….
टेक्सटाईलचे दुकान फोडून साड्या चोरी
नाशिक : टेक्सटाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या साड्या चोरून नेल्या. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळूराम चंदाराम चौधरी (रा.अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांचे परिसरात श्री सुरत टेक्सटाईल मार्केट नावाचे साड्या विक्रीचे दुकान आहे. मंगळवारी (दि.९) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी वेगवेगळया कंपनीच्या व रंगाच्या ४० पैठण्या,४० साध्या साड्या व ८० परकर असा सुमारे ६० हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
…..
बुलेटसह मोपेड चोरी
नाशिक : शहरात मोटारसायकल चोरीची मालिका सुरू असून, वेगवेगळया भागातून बुलेटसह मोपेड दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिरावाडीतील गोपाल संजय चौधरी हे सोमवारी (दि.८) सांडवा देवी भागात गेले होते पोस्ट आॅफिस बिल्डींगच्या पार्किंगमध्ये त्यांनी आपली सुमारे ८० हजार रूपये किमतीची बुलेट पार्क केली असता चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बोडके करीत आहेत. दुसरी घटना विहीतगाव येथे घडली. मन्सुरी आसिफ युसूफ (रा.माडर्न कॉलनी,दत्त पेट्रोलपंपासमोर) यांनी तक्रार दाखल केली आहे. मन्सूरी यांची मोपेड एमएच १५ एफएच ६४२१ गेल्या २० नोव्हेंबर रोजी रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
….