वर्चस्वातून एकावर प्राणघातक हल्ला
नाशिक : शहर परिसरात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वरती काढले असून वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सातपूर औद्योगीक वसाहतीतील मोतीवाला कॉलेज भागात घडली. या घटनेत तरूण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चार जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
अक्षय उत्तम भारती,अनिकेत विजय पगारे व रवि उर्फ माया दामोदर गांगुर्डे (रा.सर्व कार्बननाका शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे असून ते पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहेत. तर अनिकेत पगारे नामक संशयीत अद्याप फरार आहे. याप्रकरणी आशिष सुनिलदत्त महिरे (रा.निगळपार्क,शिवाजीनगर) या तरूणाने तक्रार दाखल केली आहे. महिरे यास संशयीत अनिकेत पगारे आणि सोनु पगारे यांचा फोन आला होता. त्यामुळे तो मंगळवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास मोतीवाला कॉलेज समोरील सार्वजनिक शौचालया जवळ गेला असता ही घटना घडली. अॅटोरिक्षातून आलेल्या टोळक्याने भावाच्या वाढदिवसात तुझ्या साथीदारांनी गोंधळ घातला या कारणावरून कुरापत काढून आशिष महिरे याच्यावर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला. या घटनेत महिरे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन शेंडकर करीत आहेत.
……









