शहरातून तीन मोटारसायकली चोरी
नाशिक : शहरात वाहन चोरीच्या घटना सुरूच असून तीन मोटारसायकली चोरी गेल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंद करण्यात आली आहे. मोटारसायकल चोरीची पहिली घटना दुर्गानगर, पंचवटी परिसरात घडली. याप्रकरणी सागर विलास शिरसाठ (रा. दुर्गानगर) यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सागर यांनी त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ जीएस ६२२८) ही सोसायटीसमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची ५० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली. दुसरी घटना राजपाल कॉलनी, मखमलाबाद रोडवर घडली. याप्रकरणी दिलीप गणेश वाघ याने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलीप याने त्यांची मोटारसायकल क्र. (एमएच १५ ईसी ७४८६) कॉलनीत पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली. तिस-या घटनेत रोहन राजाराम हिरे (रा. अभियंता नगर, कामटवाडे) यांनी गंगापूर रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहन याने त्याची मोटारसायकल क्र. (एमएच १५ डीपी ९९९३) क्रोमा शोरुमच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली.
————-
घरात घुसून मारहाण, सोनसाखळी हिसकावली
नाशिक : कॉलेजरोडवरील स्पेस मक्युर्री सोसायटीमध्ये राहणा-या फिर्यादी समीना वली सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये संशयित पायल ऊर्फ दिशा नरेश ललवाणी यांनी आपल्या पतीसोबत रात्री बारा वाजेच्या सुमारास बळजबरीने प्रवेश करत मारहाण केली व फिर्यादीच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून घेतली. या प्रकरणी सय्यद यांच्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद यांच्या राहत्या घरी संशयित ललवाणी दाम्पत्य १४ नोव्हेंबर २०२० रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास आले. व त्यांनी मागील कुरापत काढून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयित पायल हिने त्यांना हाताच्या चापटीने मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. यावेळी सय्यद कुटुंबीयांनी मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधला. यावेळी तत्काळ गंगापुर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, सहायक निरिक्षक बैसाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांना समज देत घटनास्थळावरुन हाकलून दिले होते. यानंतर पीडित सय्यद यांनी याप्रकरणी दुस-या दिवशी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पायलविरुध्द गुन्हा दाखल केला. पुढील तपास हवालदार पठाण हे करीत आहेत.
———–
वनाधिकारी कार्यालयात चोरी
नाशिक : येथील त्र्यंबकरोडवरील विभागीय वनअधिकारी कार्यालयाच्या आवारातील कूपनलिकेतील विद्युत पंप चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी शिवाजी खंडू गवांदे (५४,रा.उत्तमनगर) यांनी दिलेल्या फिर्यांदीवरुन पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास शासकीय कार्यालयाच्या आवारात प्रवेश करत चोरट्याने ५ हजार रुपये किंमतीचा विद्युत पंप चोरी केल्याचे फिर्यांदीत म्हटले आहे.
—–
तीन लाखांच्या वायरची चोरी
नाशिक : कंपनीजवळ उभ्या केलेल्या टेम्पोतून ३ लाख २ हजार ४५ रुपये किंमतीची कॉपरची वायर चोरीला गेली. याप्रकरणी गणेश चंद्रभान नागरे (रा. अश्विन नगर, सिडको) यांनी सातपुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ डिसेंबर २०२१ रोजी आयशर टेम्पो क्र. (एमएच ०४ जेयू ४९९९) सातपुर औद्योगीक परिसरातील ईएसआय ग्राऊंडच्या विरुद्ध बाजूला उभा केला होता. यावेळी अज्ञात चोरट्यांनी टेम्पोतील ३ लाख हजार २ हजार ४५ रुपये किमतीचे कॉपर वायरचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी हवालदार सोर तपास करत आहे.
————
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-यावर कारवाई
नाशिक : तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत शहरात दहशत निर्माण करणा-याविरुद्ध म्हसरुळ पोलिसांनी कारवाई केली आहे. प्रशांत बाळासाहेब फड (रा. विद्यानगर, मखमलाबाद) असे संशयिताचे नाव आहे. संशयित प्रशांत याला नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. असे असताना कोणतीही पूर्व परवानगी न घेता प्रशांत हा हातात चॉपर घेऊन दहशत निर्माण करताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस शिपाई न्याहालसिंग महेर यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे.