मामी भाचीचा विनयभंग दोघांना अटक
नाशिक : मैत्रीणीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या मामी भाचीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक संरक्षण (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोघांना अटक करण्यात आली आहे.
दीपक हिरामण घोडेस्वार (४५) व प्रदिप चंद्रकांत सोनवणे (३१ रा.समाधान स्विट जवळ,अशोकनगर भाजी मार्केट) अशी अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. या गुह्यात अटक केलेल्या संशयीतांसह शालिनी दीपक घोडेस्वार व एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार २९ मार्च रोजी पीडितेच्या मैत्रीणीचा आणि संशयीत शालिनी घोडेस्वार यांचा कुणाल मेडिकल दुकानासमोर आर्थिक देवाण घेवाणीतून वाद सुरू होता. यावेळी सदर महिला आणि तीची अल्पवयीन भाची वाद मिटविण्यासाठी गेली असता संशयीत महिलेने पीडितेचे केस पकडले तर तिच्या पतीने लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी अल्पवयीन मुलाने व प्रदिप सोनवणे याने पीडितेच्या भाचीचा विनयभंग केला. तसेच तिला खाली पाडून शिवीगाळ व मारहाण केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत.
……