नाशिक : मेडिकल दुकान फोडून रोकडसह मोबाईल व कॉस्मेटीक वस्तू पळविणा-या दोघा चोरट्यांना अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी ए.एम. शहा यांनी दोन वर्ष आणि सहा महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना मखमलाबाद रोडवरील जानता राजा कॉलनीत घडली होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हसन हमजा कुट्टी (४० रा. पवारमळा, अश्वमेधनगर) व राजकिशोर लक्ष्मीकांत बोराल (रा.गाडगे महाराज पुतळया जवळ,गणेशवाडी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रवीश विजयकमार कोहली यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. कोहली यांचे जानता राजा कॉलनीतील प्रसाद बंगला येथील शॉप नं.१ मध्ये मेडिकल दुकान आहे. १४ जुलै २०१८ रोजी मध्यरात्री चोरट्यांनी कोहली यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटून घरफोडी केली होती. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी १८ हजाराची रोकड,मोबाईल तसेच कॉस्मेटीक वस्तू असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी हवालदार आर.एस.घोरपडे यांनी दोघा आरोपींना हुडकून काढत त्यांच्याविरूध्द जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याचे कामकाज सरकारी अभियोक्ता ए.बी.कारंडे यांनी पाहिले. तर कोर्ट कर्मचारी हवालदार डी.एस.काकड यांनी गुन्हा सिध्दतेसाठी पाठपुरावा केला. या खटल्यात फिर्यादी,साक्षीदार व पंचाची साक्ष आणि तपासी अधिका-यांनी सादर केलेले परिस्थीतीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने दोघा आरोपींनी दोन वर्ष आणि सहा महिन्यांचा सश्रम कारावास व प्रत्येकी तीन हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.
….