नाशिक – शहरासाठी योजिलेल्या एकमेवाद्वितीय, नाविन्यपूर्ण आणि प्रतिष्ठेच्या मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्र शासनाच्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पब्लिक इनव्हेसमेंट बोर्ड (PIB)ने अनुमोदित केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा अंतिम मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच केंद्र शासनाची अंतिम मान्यता या प्रकल्पाला मिळून प्रकल्पाचे काम सुरु होणार आहे.
केंद्र शासन, राज्य शासन, सिडको आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरासाठी ३३ किमीचा मेट्रो निओ मार्ग बनवण्यात येणार आहे. गंगापूर ते मुंबई नाका आणि गंगापूर ते नाशिक रेल्वे स्थानक अशा ३३ किमीच्या दोन मार्गिकांमध्ये एकूण ३० स्थानके असणार आहेत. हा २०९२ कोटींचा प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण होईल.
नाशिक मेट्रो निओ प्रकल्प हा नाविन्यपूर्ण अश्या रबर टायर बस वापरून जलद प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. या रबर टायर बस ओव्हरहेड इलेक्ट्रिक द्वारा चालवण्यात येतील. संपूर्ण ३३ किमीची मार्गिका उन्नत असेल, त्यामुळे शहरातून या बस विनासायास व जलद गतीने प्रवास करू शकतील.









