विदेशातून आलेल्या प्रवाशांचा व त्यांच्या सहवासीतांवर लक्ष ठेवण्याच्या सुचना
नाशिक: जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा ड्राय रन झाला असून त्यातील निरीक्षणांची नोंद प्रशासनाने घेतली आहे व त्याप्रमाणे लसीकरणासाठी नाशिक जिल्हा सज्ज झाल्याचे दिसत असल्याचे मत मुख्यमंत्री टास्क फोर्सचे मुख्य सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले. तसेच विदेशातून आलेले प्रवासी यांचे गमना गमना वर विशेष लक्ष देऊन त्यांची कोरोना चाचणी वेळोवेळी शीघ्रतेने करून घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना व अनुषंगिक विषयाच्या संदर्भाने प्रमुख अधिकाऱ्यांच्या झालेल्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस उपाधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रेखा रावखंडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के.आर. श्रीवास, नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य सल्लागार डॉ. श्री. म्हैसेकर म्हणाले, जे अधिकारी व कर्मचारी अतिजोखमिच्या पातळीवर काम करत आहेत त्यांना लसीकरणात प्राधान्याने समाविष्ट करण्यात यावे. लसीकरण मोहिमेत कामाचा भार, भौगोलिक परिस्थिती यांचा विचार करून विविध स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची पर्यवेक्षण टीम्स तयार करण्यात याव्यात. लसीकरण कार्यक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांचाही सहभाग होण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. लसीकरणाचे लाभार्थ्यांना लाभ देण्यापूर्वी त्यांच्या ॲलर्जी व प्रतिकारक्षमतेचा वैद्यकीय इतिहास संकलित करण्यात यावा. लसीकरणानंतर होणारा जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाटीच्याही उपाययोजना कराव्यात. लसीकरणासाठी तीन रूम निश्चित करण्यात याव्यात तसेच आवश्यकतेनुसार व्हॅक्सिन कॅरिअर खरेदीच्याही सूचना यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या आहेत. लसीकरणाबाबत लाभार्थ्यांपर्यंत सविस्तर प्रचार प्रसार करण्यात यावा. लस टोचणाऱ्या टोचकांना लसीच्या साठवणुकीपासून लस वाहतुक, लस हताळणी, टोचणी तसेच त्यापासून लाभार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या परिणाम याबाबच्या माहितीशी अवगत करावे, असेही यावेळी श्री. म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.
नोव्हेंबर २०२० नंतर भारतात परतलेल्या प्रवाशांचे व त्यांच्या निकटतम सहवासीतांचा त्वरित शोध घेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यात यावी. तसेच त्यांचा भारतात आलेल्या दिवसापासून पुढे २८ दिवस पाठपुरावा करण्यात यावा. त्यातील पॉझिटिव्ह रूग्णांच्या सहवासीतांचे त्वरीत ट्रेसिंग व टेस्टींग करून घेण्यात यावे. आवश्यकतेनुसार संशयीत रूग्णांना संदर्भसेवा उपलब्ध करून देण्यात यावी.
सुपर स्प्रेडर ओळखून तपासणी करा
सध्या लग्न व तत्सम स्वरूपाच्या कौटुंबिक व सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत त्यात सहभागी व्यक्ती, सुपर स्प्रेडर असलेल्या अतिजोखिमेच्या शक्यतेचे असलेले वाहन चालक, भाजीविक्रेते, दुकानदार, फळ विक्रेते, कोमॉर्बिड पेशंट, ज्येष्ठ नागरीक, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, कैदी, बालसुधारगृह, वृद्धाश्रम येथे टेस्टिंगवर भर देण्यात यावा. सर्व चाचण्या ह्या आसीएमआर च्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच करण्यात याव्यात, असे सांगून डॉ. म्हैसेकर पुढे म्हणाले की, कोविड रूग्णांच्या पॉझिटिव्ह येण्याचा ट्रेंड लक्षात घेवून करोना च्या सोयीसुविधा वाढविणे अथवा कमी करण्याचे नियोजन करण्यात यावे. डीसीएच, डीसीएचसी, डीसीसीसी मधील व्हेंटीलेटर्स, आयसीयु बेड, ऑक्सिजन बेड, बिगर ऑक्सिजन बेड उपलब्ध ठेवावेत.
रूग्णसंख्या भौगोलिक परिस्थिती व इतर वाहतुक आणि संदर्भसेवेच्या दृष्टिने तसेच लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने सुलभ असणारी केंद्रे सुरू ठेवणे बाबीत निर्णय घेण्यात यावा. येणाऱ्या काळात जास्तितजास्त तपासण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात यावा.रूग्णांन संदर्भसेवेबरोबरच शक्यतो आरटीपीसीआर टेस्ट करण्यावर भर द्यावा जेणेकरून पॉझिटिव्ह रूग्ण तपासणीतून सुटणार नाहीत. पॉझिटिव्ह रूग्णांच्या सहवासीतांचेही त्वरीत ट्रेसिंग व टेस्टींग करून त्यात त्यांच्या निकटवर्तीय, सहप्रवासी, सहकर्मचारी, सार्वजनिक कार्यक्रम, सभांमध्ये उपस्थित असलेले आदींचा कसून शोध घेण्यात यावा असेही यावेळी मुख्यमंत्री यांच्या कोविड-१९ च्या टास्क फोर्स चे मुख्य सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या आजपर्यंतच्या परिस्थितीचे प्रास्तविक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. मागील कोविड रूग्णांची गेलेली कमाल उच्चांक पातळी विचारात घेवून त्यानुसार जिल्ह्यामध्ये बेडची उपलब्धता ऑक्सिजनची उपलब्धता औषधांची उपलब्धता हे सर्व नियोजन परिपूर्ण रित्या केले गेले असल्याचे सविस्तर माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. महानगरपालिकेबात आयुक्त कैलास जाधव तर जिल्हा परिषदेबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सादर केली. कोरोना संदर्भातील वैद्यकीय सोयीसुविधांबात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी आपापल्या क्षेत्रातील सद्यस्थितीचे सादरीकरण केले.