नाशिक : वर्दळीच्या मुक्तीधाम परिसरात एका इमारतीत चालणारा जुगार अड्डा पोलीसांनी उध्वस्त केला. या कारवाईत आठ जुगारींना बेड्या ठोकण्यात आल्या असून त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे २१ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम सुंदर सुभेकर (रा.गाडेकर मळा,देवळालीगाव) व त्याचे सात साथीदार असे अटक केलेल्या जुगारींचे नाव आहेत. मुक्तीधाम समोरील शिवम कॉम्प्लेक्स येथे राजरोसपणे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१८) रात्री पोलीसांनी छापा टाकला असता संशयीत अड्डा चालकासह जुगारीं अश्या आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. संशयीत पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर जुगार खेळत होते. संशयीतांच्या ताब्यातून १४ हजार २९० रूपयांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा सुमारे २१ हजार १३० रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस शिपाई लक्ष्मण न-हेराव यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.