नाशिक – नाशिक महानगर पालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना केल्या जात असताना महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी मुक्तीधाम मधील भक्त निवासाची पाहणी केली.
शहरात कोरोना बाधितांचे संख्या दिवसेंदिवस वाढत असून ती कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात असताना भविष्यात रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास त्या रुग्णांना राहण्याची व्यवस्था मनपाच्या हॉस्पिटल मध्ये करण्यात आलेली असून त्यामध्ये असणारे बेड कमी पडल्यास भविष्यातील उपाययोजना म्हणून मुक्तिधाम मधील गोवर्धन भक्त निवास, आयोध्या भवन व गोकुळ भवन या तीन इमारतींची पाहणी करून त्या ठिकाणी मनपास आवश्यकता भासेल त्यावेळी रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने या इमारती मध्ये व्यवस्था करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागास आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. यावेळी आयुक्त कैलास जाधव यांचे समवेत कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर,कोरोना कक्ष अधिकारी डॉ.आवेश पलोड,डॉ.जितेंद्र धनेश्वर,उपअभियंता निलेश साळी,विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांनी पाहणी करून मुक्तिधामचे ट्रस्टी नटवरलाल चव्हाण व जगदीश चव्हाण यांच्याशी चर्चा केली.