मुंबई – मुंबई ते नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे असले तरी टोलची वसुली का सुरू आहे? असा प्रश्न युवा सेनेने विचारला आहे. खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण झाले असून तत्काळ टोल वसुली थांबवावी, अशी मागणी युवा सेनेने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. तसे प्रत्र त्यांनी गडकरी यांना पाठविले आहे. निकृष्ट दर्जाच्या कामावर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याने युवा सेनेतर्फे वरुण सरदेसाई यांनी नितीन गडकरींकडे रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ सुरु करावे अशी मागणी केली आहे. पावसामुळे रस्त्याची झालेली दुरावस्था लक्षात घेता टोल वसुली थांबावी व संबधित अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रवाशाने काढला व्हिडिओ
अतुल कसबेकर या प्रवाशाने मुंबई-नाशिक प्रवासादरम्यान निकृष्ट दर्जाच्या महामार्गाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तसेच, टोलवसुली अंतर्गत जमा होणार पैसा नक्की कोणत्या कामात वापरला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम पाहता ‘एक्स्प्रेस वे’ म्हणणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया कसबेकर यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने संबंधित विषयाकडे गांभिर्याने पाहावे, अशी मागणी युवा सेनेतर्फे करण्यात आली आहे.