घोटी (ता. इगतपुरी) – नाशिक-मुंबई किंवा मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी सुखद बातमी आहे. समृद्धी महामार्ग आणि मुंबई-आग्रा महामार्ग (एनएच ३) यांना जोडणारा सहापदरी उड्डाणपूल होणार आहे. यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा केला होता. अखेर या उड्डाणपुलास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई हा प्रवास अवघ्या अडीच तासातच होणार आहे.
खासदार गोडसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातांना आळा बसावा, नाशिक–मुंबई प्रवासाचा कालावधी कमी व्हावा तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी समृद्धी महामार्ग आणि नाशिक–मुंबई महामार्ग क्र. ३ यांना जोडणारा उड्डाणपूल साकारला जाणार आहे. या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४८ कोटी रुपयांच्या खर्चाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. यामुळे इगतपुरी तालुक्यातील पिंप्री सदो येथे सहापदरी उड्डाण पुल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक – मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून आता अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले आहे.
समृद्धी महामार्गाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. नाशिक – मुंबई महामार्ग क्र. तीन आणि समृद्धी महामार्ग या दोन ही महामार्गांमध्ये अंतर असल्याने प्रवाशांना कनेक्टीव्हीटीची मोठी अडचण होती. हे दोन्ही महामार्ग पिंप्री सदो शिवारापासून अगदी जवळ आहेत. दोन्ही महामार्गांची जोडणी नसल्याने याठिकाणी सतत वाहतूक ठप्प होते. तसेच या ठिकाणी रोजच अनेक लहान – मोठे अपघात होत असतात. परिणामी वाहतूक कोलमडते. समृद्धी महामार्ग आणि नाशिक – मुंबई महामार्ग यांना जोडणाऱ्या पिंप्री सदो शिवारात उड्डाणपुला व्हावा, यासाठी गोडसे गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. या कामासाठी गोडसे यांचा सतत केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा सुरु होता.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रिंपी सदो शिवारात वरील दोन ही महामार्गांना जोडणाऱ्या उड्डाण पुलाला जानेवारी महिन्यात मान्यता दिलेली आहे. त्यानंतर गोडसे यांनी निधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा केला. अखेर त्यास यश आले असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रिंपी सदो येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी तब्बल ४८ कोटी रुपयांच्या निधीला तत्त्वत: मान्यता दिली आहे. यापैकी १० कोटी रुपये नॅशनल हायवे (राष्ट्रीय महामार्ग) तर उर्वरित ३८ कोटी रुपये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ देणार आहे.
असा असेल उड्डाणपूल
पिंप्री सदो येथील उड्डाणपुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असणार आहे. हा उड्डाणपूल सहा पदरी असेल. गोंदे पर्यंत महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या प्रस्तावही आता लवकरच मार्गी लागणार आहे. यामुळे नाशिक-मुंबई हा प्रवास आता अडीच तासांवर येणार आहे. यामुळे उद्योग व व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला आहे.