नाशिक : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर दबा धरून मालवाहू वाहन चालकांना लुटणा-या टोळीचा पर्दाफास करण्यात पंचवटी पोलीसांना यश आले आहे. सहा जणांच्या टोळीस पोलीसांनी सिडकोत बेड्या ठोकल्या असून त्यांच्या अटकेने नाशिक ग्रामिणसह शहरातील लुटमारीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयीतांच्या ताब्यातून रोकड,दुचाकी आणि धारदार शस्त्र असा दीड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
नकुल रविंद्र परदेशी (रा.हेडगेवार नगर त्रिमुर्तीचौक ),गौरव अरुण माळी, (परदेशी चाळ, हनुमानवाडी),मयूर रत्नाकर पाचोरे (रा.मेहेरधाम पेठरोड), प्रणव विनोद शेवाळे (रा.कामटवाडा,सिडको), शुभम राजू पाटील (रा.श्रीकृष्ण चौक सिडको), निलेश मदन गर्दे (रा.मटाले फार्म मागे,सिडको) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत.
अटक केलेले संशयित १९ ते २२ वयोगटातील असून त्यांनी अंबड, म्हसरूळ आणि आशेवाडी भागात लुटमारीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मंगळवारी (दि.२३) पहाटे दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी शिवारात ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवित रोकड व मोबाईल हिसकावून घेत लुटले होते. सदरचे दुचाकीस्वार संशयित नाशिकच्या दिशेने निघाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कामाला लागले होते. वरिष्ठ निरीक्षक अशोक भागत यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना देत संशयितांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले होते. संशयित अन्य मागार्ने पसार होणार नाही यासाठी दिंडोरी आणि पेठरोड पिंजून काढण्याचा आदेश दिला होता. पंचवटी पोलीस आशेवाडीच्या दिशेने कुच करीत असतांना समोरून आलेल्या बोलेरो चालकाने पोलीस वाहन थांबवून टोळक्याने आपल्यास लुटल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून नजीकच्या हॉटेल परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता संशयीत टोळके पोलीसांच्या हाती लागले. सीसीटिव्ही फुटेजमध्ये पंचवटी पोलीसांच्या रेकॉर्ड वरील सराईत नकुल परदेशी याचा समावेश असल्याचे कर्मचारी विलास चारोस्कर यांनी ओळखले. त्यानंतर सिडको परिसरातून या टोळीस जेरबंद करण्यात आले असून त्यांनी गुह्याची कबुली दिली आहे. संशयीतांच्या अटकेने तीन गुन्हे उघडकीस आले असून लुटमारीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. संशयितांना म्हसरूळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.