नाशिक : भरधाव मालट्रकने धडक दिल्याने छोटा हत्ती पलटी होवून, एकाच कुटूंबातील दोन महिला ठार झाल्या. तर छोटाहत्ती चालकासह सहा जण जखमी झाले असून,हा अपघात गिरणारे – धोंडेगाव मार्गावर झाला. याप्रकरणी ट्रकचालका विरूध्द नाशिक तालूका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निर्मला जनार्दन पालवे (३०) व रेखा उर्फ पूनम वाल्मिक पालवे (२३) अशी अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे असून या अपघातात छोटाहत्ती चालक बाळु अर्जुन पालवे (३८), यशवंत काशिनाथ पालवे (४०), यमुना श्रावण पालवे (३०), भागाबाई भगवान पालवे (३०), तुळसाबाई तुळशीराम पालवे (४०), शिलाबाई देवानंद पालवे (४० रा. सर्व गंगाम्हाळुंगी) आदी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
पालवे कुटूंबिय बुधवारी (दि.२४) मध्यरात्री गिरणा-याकडून आपल्या गावी जाण्यासाठी छोटा हत्ती (एमएच १५ एफयू ९३६३) मधून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. गंगाम्हाळूंगी शिवारात हरसूल कडून गिरणा-याच्या दिशेने वाळू भरूण भरधाव येणा-या एमएच ०४ डीडी ९०७० या मालट्रकने छोटाहत्तीस धडक दिली. छोटा हत्ती चालकाने प्रसंगावधान राखत आपले वाहन वेळीच वळविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात छोटा हत्ती वाहन रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चारीत जावून उलटला. त्यामुळे छोटा हत्तीतील महिला, पुरुष इकडे तिकडे फेकले गेले. रात्रीच्या अंधारात कोण कुठे जाऊन पडले, हे कोणालाही कळत नव्हते. आजुबाजुच्या रहिवाश्यांनी वेळीच धाव घेत मदत कार्य हाती घेतल्याने जखमींना तात्काळ जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. या अपघातात वरिल दोन्ही महिलांचा उपचारापूर्वीच मृत्यु झाला. तर जखमींवर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू असून गंभीर परिस्थीती असलेल्या रूग्णांना खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने आपले वाहण सोडून पोबारा केला असून अधिक तपास तालूका पोलीस करीत आहेत.
….