मालकाच्या बँक खात्यावर चालकाचा डल्ला
नाशिक : मालकाच्या बँक खात्यावर कारचालकाने डल्ला मारल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. भामट्या चालकाने धनादेशावर मालकाची बनावट साक्षरी करून २ लाख ३२ हजाराची रक्कम आॅनलाईन आपल्या खात्यात वर्ग करून त्यातील ६० हजार रूपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रातेश विश्राम कर्डक (रा.श्रीवास्तूशिल्प,शिवतेजनगर) असे संशयीत चालकाचे नाव आहे. रमेश उध्दव कुलकर्णी (रा.महालक्ष्मीनगर,आडगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कर्डक गेल्या अनेक वर्षापासून कुलकर्णी यांच्या वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. कुलकर्णी प्रवासात महत्वाची कागदपत्रांची बँग सोबत ठेवत असल्याचे त्यास माहिती होती. गेल्या महिन्यात संशयीताने कारमधील कुलकर्णी यांच्या बॅगेतून दोन धनादेश चोरी केले. या धनादेशावर त्याने खोटी साक्षरी करून कुलकर्णी यांच्या कल्याण जनता सहकारी बँकेच्या गंगापूर खात्यात वटण्यासाठी टाकला. २ लाख ३२ हजार रूपयांची रक्कम संशयीताने परस्पर मेहर सिग्नल येथील इंडियन बँकेच्या स्व:ताच्या खात्यात वर्ग गेली. या नंतर ११ ते २० पेब्रुवारी दरम्यान वर्ग झालेल्या रकमेतील ५० हजार एटीएममधून तर दहा हजार स्लिप भरून काढले. ही बाब लक्षात येताच कुलकर्णी यांनी बँक आणि पोलीसांकडे धाव घेतल्याने उर्वरीत रक्कम त्यांच्या हाती लागली असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
…..
काठेगल्लीत महिलेचे मंगळसुत्र खेचले
नाशिक : फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळयातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना काठेगल्लीत घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीराज – किशोरी नरेश गुप्ता (रा.श्रीहरी अपा.काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. किशोरी गुप्ता या मंगळवारी (दि.३०) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातून फेरफटका मारून त्या कपिला स्टील समोरून त्या पायी आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. निलम बंगला भागात समोरून दुचाकीवर आलेल्या भामट्यांने त्यांच्या गळय़ातील मंगळसुत्र ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.
…..
स्वामीनगरला ७५ हजाराची घरफोडी
नाशिक : मखमलाबाद येथील स्वामीनगर भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला.त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईलचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी प्रेमराज परदेशी (रा.अंजली रो हाऊस स्वामीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. परदेशी कुटूंबिय दि.२७ ते २९ मार्च दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे आणि मोबाईल असा सुमारे ७३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.
…….
आयशर मधून डिझेलची चोरी
नाशिक : शहरात पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रकार वाढले असून, पार्क केलेल्या वाहनांमधून इंधन चोरीस जात आहे. सातपूर येथील टेम्पो थांबा भागात पार्क केलेल्या आयशर ट्रक मधून चोरट्यानी तब्बल तीस लिटर डिझेल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव किसन पवार (रा.अशोकनगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पवार यांनी आपला मालवाहू आयशर ट्रक (एमएच १७ डीबी ०००४) सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास नेहमीप्रमाणे सातपूर येथील टेम्पो स्टॅण्ड येथे पार्क केला असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी आयशरच्या डिझेल टँकमधून सुमारे ३० लिटर इंधन परस्पर काढून नेले. अधिक तपास हवालदार गिते करीत आहेत.
….