नाशिक – मामीचे कागदपत्र देवून परप्रांतीय भाच्याने परस्पर क्रेडिट कार्ड काढल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या कार्डच्या माध्यमातून भामट्या भाच्याने तब्बल पावणे पाच लाख रूपयांचा परस्पर व्यवहार करून कर्जाचा डोंगर उभा केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर मनोज सिंग (२५ रा.ओघनी ता.लालगंज जि.आझमगड उत्तरप्रदेश) असे मामीस गंडविणा-या संशयीत भाच्याचे नाव आहे. याप्रकरणी पाथर्डी फाटा भागात राहणा-या वंदना सिंग (४० रा.प्रशांतनगर) या महिलेने तक्रार दाखल केली आहे. संशयीत सागर सिंग हा महिलेचा भाचा असून तो २०१८ मध्ये आपल्या मामाकडे वास्तव्यास होता. या काळात त्याने मामीचे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नाशिकरोड शाखेत बचत खाते असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर त्याने बँक गाठून मामीचे कागदपत्रांचा गैरवापर करून क्रेडिट कार्ड मिळविले. या क्रेडिट कार्ड साठी त्याने स्व:ताचा मोबाईल नंबर दिला. त्यानंतर मात्र त्याने या कार्डचा वापर करून ४ लाख ४५ हजार ७२१ रूपये कर्जाचा डोंगर उभा केला. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रक्कम काढून घेत त्याने अपहार केला. बँकेचे वसूली पथक महिलेच्या घरी पोहचल्याने ही घटना उघडकीस आली. महिलेने संशयीताशी संपर्क साधला असता त्याने फोनवर शिवीगाळ आणि दमदाटी करीत पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर वंदना सिंग यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक परदेशी करीत आहेत.