नाशिक – नाशिक माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ ,नाशिक यांनी स्वागताहार्य निर्णय घेऊन अध्यक्ष दाभाडे व सचिव सूर्यवंशी मॅडम यांनी मंडळातील नोंदित माथाडी कामगारांना राखीव निधीतून प्रत्येकी दोन हजार रुपये पहिला हप्ता माथाडी कामगारांच्या खात्यावर या आठवड्यात वर्ग केल्याची माहिती माथाडी संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी सुनील यादव व कृष्णराव जगदाळे यांनी दिली. याबाबत कोरोना महामारीच्या कालावधीत अर्थसाहय मिळाल्या बद्दल नाशिक माथाडी मंडळातील नोंदित माथाडी कामगार बंधूनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार विभाग व नाशीक माथाडी मंडळ पदाधिकारी यांचे आभार मानल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण देशावर आलेल्या कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे माथाडी कामगारांना निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीकरीता अर्थसहाय मिळावे याबाबत संघटनेचे नेते सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष शशिकांत शिंदेसा, संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला, याची दखल घेऊन शासनाच्या कामगार विभागाने २२ जुलै २०२० रोजी माथाडी कामगारांना माथाडी मंडळाच्या राखीव निधीतून प्रत्येकी ५००० रुपये पर्यंत रक्कम देणेबाबत सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने मुंबई येथील ग्रोसरी, ट्रान्सपोर्ट भजिपाला या माथाडी मंडळाने प्रत्येकी पाच हजार रुपये माथाडी कामगारांच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतर ही रक्कम आता मिळू लागल्याचे सुनील यादव यांनी सांगितले.