नाशिक रोड – माजी नगरसेवक व शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश बोराडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या बारा दिवसापासून ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. प्रभाग क्रमांक १८ च्या नगरसेविका व माजी उपमहापौर रंजना बोराडे यांचे ते पती होत. प्रकाश बोराडे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत. गेल्या २८ वर्षापासून नगरसेवकपद हे बोराडे यांच्या घरात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी नंतर सध्या शिवसेनेचे पदाधिकारी म्हणुन त्यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशचे सचिव व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार या पदावर ते कार्यरत होते, राज्य निवड चाचणी स्पर्धा, विविध कब्बड्डी, व क्रीडा स्पर्धांचे त्यांनी आयोजन केले होते. बोराडे यांनी पंचकला आनंदेश्वर व्यायामशाळा लोकवर्गणीतून सुरु केली होती.
असा होता प्रकाश बोराडे यांचा राजकीय प्रवास
नाशिकरोडच्या पंचक गावातून १९९२ पासून राजकिय कारकिर्दीला सुरुवात केलेले प्रकाश बोराडे हे अंबडच्या क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीतील कुशल कामगार होते. कंपनीतील कामगारांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याची हातोटी आल्याने कामगार नेते, म्हणुनही काम केले. २००३ साली स्वेच्छा निवृत्ती घेतली, कै. गोपाळराव गुळवे यांचे भाचे जावई होते. त्यामुळे ते राजकारणात आले. त्यानंतर त्यांना महानगरपालिकेची उमेदवारी सुध्दा मिळाली. पंचक, जेलरोड व नाशिकरोड भागात सामाजिक कार्य, मवाळ स्वभाव व दांडगा जनसंपर्क असल्याने नागरिकांनी १९९२ पासून अद्याप पर्यंत कधी ते तर कधी पत्नी रंजना यांनाच नगरसेवक म्हणुन निवडून दिले. पंचक गावात गणेश एकता मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली, शिवनेरी प्रतिष्ठाण, बोराडे फांऊडेशन, समर्थ सेवा मंडळ आनंदेश्वर व्यायाम शाळाच्या माध्यमातून काम उभे केले होते, जेलरोड भागात वसाहत वाढल्याने या भागातल्या प्राथमिक गरजासांठी लोकांची मागणी जोर धरु लागली, त्यामुळे बोराडे यांनी युवकांच्या सहकार्याने व्यायामशाळा, पाणी ्प्रश्न, रस्ता रुंदीकरण, गार्डन, प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका धरला, जेलरोड भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होता यावर महापालीकेनेही हात टेकले होते, चेहेडी पंपींग येथून पाणी पुरवठा कमी होत असल्याने अखेर पंचवटीतून नांदूर नाका मार्गे रहदारी पूलावरुन पाण्याची पाईपलाईन आणून जेलरोडचा पाणी प्रश्न सोडविला होता. यासाठी महापालिकेला पाणी पुरवठा कमी होत असल्याने चेहेडी बंधा-याचे कामही याच काळात सुरु होते. मात्र ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे वेळ लागत असल्याने अखेर पंचवटीतून पाणी उपलब्ध करुन दिले होते, त्याच बरोबर चेहेडी बंधा-याच्या कामामुळे पळसे शिवारातील जमीनी वाहून गेल्याने शेतक-यांचा प्रश्न महापालिकेत ठामपणे त्यांनी मांडला होता.